शिक्षकांच्या हक्कासाठी जेएनपीटीला धारेवर धरू : आ.बाळाराम पाटील

। पनवेल । वार्ताहर ।
जेएनपीटी येथील आर.के.फाउंडेशनच्या मार्फत चालविण्यात येणार्‍या शाळेच्या कारभाराविरोधात शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि पालकांकडून कडाडून विरोध होत आहे. गेली दोन वर्षे या लढ्यात न्यायालयाने शिक्षकांच्या बाजूने निकाल दिला असला तरी मात्र आर.के.फाउंडेशनने न्यायालयाच्या निकालाचा अवमान करून शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि पालकांवरील अन्याय सुरूच ठेवला आहे. गतवर्षी 6 शिक्षकांना बेकायदेशीरपणे कामावरून कमी करण्यात आल्यानंतर आता तर शाळेच्या मुख्याध्यापकांना सुद्धा घरी बसविण्याचा प्रकार केला आहे. या प्रकाराच्या निषेधार्थ गेले दोन दिवस जेएनपीटी टाऊनशिप येथे शिक्षकांसह कर्मचारी आणि पालकांनी शाळेच्या गेटवर बेमुदत आंदोलन सुरु केले. यावेळी उरण विधानसभा मतदार संघाचे माजी आ.मनोहर भोईर, कोकण शिक्षक मतदार संघाचे आ.बाळाराम पाटील यांनी शिक्षकांच्या मागे आपण खंबीरपणे उभे राहून जेएनपीटी प्रशासनाला धारेवर धरणार तसेच शिक्षक आणि पालकांच्या लढ्यात आम्ही शेवटपर्यंत सोबत राहून न्याय मिळवून देणार असल्याचे आश्‍वासन दिले. आंदोलनादरम्यान जेष्ठ समाजसेवक प्राध्यापक एल,बी.पाटील यांनी आर.के.फाउंडेशनच्या व्यवस्थापकांना खडे बोल सुनावले आहेत. यावेळी शिक्षक नेते नरसू पाटील यांच्या नेतृत्वाखाली सदरचे आंदोलन करण्यात आले.


रुस्तमजी केरावाला फाउंडेशन यांनी नियमांची पायमल्ली करून शिक्षकांसह शिक्षकेतर कर्मचारी यांना रस्त्यावर आणले आहे. त्यांच्या या निर्णयामुळे जेएनपीटीमध्ये शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात आहे. आर.के.फाउंडेशनने अनेक कर्मचार्‍यांना सेवेतून निलंबित करण्याचे लेखी आदेश जारी केले आहेत. अखेर शालेय शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि पालक यांच्यावर झालेल्या अन्यायांच्याविरोधात जेएनपीटी येथील टाऊनशिप परिसरात असलेल्या आर.के.फाउंडेशनच्या व्यवस्थापकांविरोधात तसेच जेएनपीटी व्यवस्थापक यांच्याविरोधातील आपला लढा अधिक तीव्र होणार असल्याची भावना यावेळी शिक्षक आणि पालकांमधून व्यक्त करण्यात आली.

Exit mobile version