| चिरनेर । वार्ताहर ।
आवरे उरण येथील रामचंद्र म्हात्रे विद्यालयात मागील काही दिवसापासून समाजकंटकांनी हैदोस घातला असून, शाळेत जाळपोळ करण्याचा प्रयत्न केला असून, शाळेतील पंखे आणि इतर सामानाची नासधूस केली आहे. या प्रकारामुळे शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षक दहशतीच्या छायेखाली वावरत आहेत. पोलिसांनी या प्रकाराची गंभीर दखल घेऊन कारवाई करावी अशी मागणी पालक आणि शिक्षक वर्गाने केली आहे.
या विद्यालयात 5 वी ते 12वी पर्यंत 854 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. गुरुवारी (दि.17) काही समाजकंटक रात्री शाळेमध्ये घुसून शाळेतील टेबल जाळून शाळेच्या किचनमधील गॅस शेगडी पेटवून त्यावर शाळेतील कागदपत्रे व पुस्तके जाळण्यात आली होती. याबाबत शाळा प्रशासनाने उरण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. मात्र पोलिसांनी या गंभीर प्रकाराची दखल घेतली नाही. आता पुन्हा एकदा सोमवार (दि.21) रात्री अज्ञात समाजकंटकांनी शाळेत शिरुन शाळेतील दोन वर्गातील पंखे वाकवून सामानाची नासधूस केली.