होळी करू लहान, पोळी करू दान

आदिवासी, गरिबांची होळी झाली गोड
पालीतील एक संघर्ष समाज सेवेसाठी व अंनिसचा विधायक उपक्रम

। पाली/बेणसे । प्रतिनिधी ।

दरवर्षीप्रमाणे यावर्षीदेखील ‘होळी लहान करा, पोळी दान’ करा असे आवाहन अंनिसमार्फत करण्यात आले होते. त्यानुसार पालीतील एक संघर्ष समाज सेवेसाठी व अंनिसने पोळ्या संकलित केल्या. आणि या पोळ्या आदिवासी वाड्या-पाड्यांवर वाटून आदिवासी व गरिबांची होळी गोड केली.
होळी सण रंगांचा, सण नात्यांचा, दुष्ट आणि वाईट प्रवृत्तीचं निर्दालन करणारा म्हणून होळीचा सण साजरा केला जातो. हा सण रंगांचा आणि सर्वांचा आनंद द्विगुणित करणारा असतो. त्यामुळे तो पर्यावरण पूरक साजरा करावा. होळी लहान करा, पोळी दान करा असे आवाहन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती रायगड मार्फत करण्यात आले होते. या उपक्रमास सर्वच स्थरातून उदंड प्रतिसाद लाभला.
दरवर्षी रायगड जिल्ह्यात महा. अंनिसच्या या अभियानास मोठा पाठिंबा मिळताना दिसत आहे. मागिल वर्षी सुधागड तालुक्यात पाली, अलिबाग, पेण, खोपोली, नागोठणे अशा अंनिस वेगवेगळ्या शाखेच्या वतीने होळी लहान करा, पोळी दान करा या आव्हानाला मोठा प्रतिसाद मिळाला होता. यावर्षीही अनेक हितचिंतक व सामाजिक संघटनांनी देखील या उपक्रमात सहभाग घेतला व मोठ्या प्रमाणात पोळ्या दान केल्या. यावेळी हजारो पोळ्या जमा झाल्या होत्या. या सर्व पोळ्या अंनिसच्या कार्यकर्त्यांनी आदिवासी वाड्यांवर नेऊन वाटून गोरगरिबांची होळी गोड केली.
महा. अंनिस सुधागड-पाली शाखेचे प्रधान अमित निंबाळकर व निधी संकलन कार्यवाह रोशन रुईकर, महेंद्र निकुंभ, श्रीकांत ठोंबरे, संदीप महाडिक, किशोर चौधरी, स्वप्नील खंडागळे, विनय निकुंभ या तरुणांनी पुढाकार घेत हा उपक्रम यशस्वी केला. या उपक्रमास जिल्हा अध्यक्ष विवेक सुभेकर, कार्याध्यक्ष मोहन भोईर, जिल्हा प्रधान सचिव संदेश गायकवाड, जिल्हा बुवाबाजी संघर्ष प्रमुख अमित निंबाळकर आदींचे मार्गदर्शन लाभले.

Exit mobile version