| अलिबाग | प्रतिनिधी |
जनसुरक्षा विधेयक मंजूर झाल्यास लोकशाहीधिकार संपुष्टात येतील. गोरगरीबांच्या न्याय हक्कासाठी आवाज उठविणे गुन्हा ठरेल. गरीबांचे प्रश्न मांडणाऱ्यांना दहशतवादी समजले जाईल. सभागृहात जरी सत्ताधाऱ्यांचे बहूमत असले, तरी रस्त्यावर आमची सत्ता आहे. संघटीत होऊन लढा देऊ आणि हा अन्यायकारक कायदा हाणून पाडू, या असे आवाहन शेकाप सरचिटणीस जयंत पाटील यांनी केले.
जन सुरक्षा विधेयक रद्द करण्यात यावे, या मागणीसाठी शेतकरी कामगार पक्ष, राष्ट्रवादी (शरद पवार गट), शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे गट) भाकप, माकप, समाजवादी पक्ष, भारत जोडो अभियान, श्रमिक मुक्तीदल अशा वेगवेगळ्या डाव्या संघटनांच्या वतीने मुंबईत आझाद मैदानावर मोर्चाचे आयोजन केले. यावेळी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना नेते उध्दव ठाकरे, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आ. अनिल परब, आदित्य ठाकरे, मिलींद नार्वेकर, सचिन अहिर, शेकाप राज्य कार्यालयीन चिटणीस ॲड. राजेंद्र कोरडे, शेकाप राज्य मिडीया सेलच्या अध्यक्षा तथा प्रवक्त्या चित्रलेखा पाटील, सौम्या कोरडे, सुभाष लांडे, प्रकाश रेड्डी, शैलेंद्र कांबळे, एस. के. रेगे, राहूल गायकवाड, मिराज सिध्दीकी, उल्का महाजन, उदय भट आदी वेगवेगळ्या संस्था संघटनाचे पदाधिकारी, नेते मंडळी उपस्थित होते. यापुढे मार्गदर्शन करताना जयंत पाटील म्हणाले कि, जनसुरक्षा विधेयक हे घटनाविरोधी असून, लोकशाहीस बाधक आहे. जनतेच्या मुलभूत हक्कांवर गदा आणणारे आहे. गळचेपी करणारे हे विधेयक आहे.
सामाजिक प्रश्नांवर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना त्रास देण्यासाठी या कायद्याचा हत्यार म्हणून वापर केला जाऊ शकतो. चळवळींचा विरोध मोडून काढण्यासाठी या कायद्याचा वापर होऊ शकतो. देशासह महाराष्ट्रातील कामगार, शेतकरी आदींनी रक्त सांडल्याने त्यांच्या न्याय हक्कासाठी कायदे झाले आहेत. मात्र, हेच कायदे आता बदलण्याचा घाट सरकारने सुरू केला आहे. त्याविरोधात शेकापसह वेगवेगळ्या संस्था, संघटनांनी लढा देण्यास सुरुवात केली आहे. जन सुरक्षा विधेयकाविरोधात तीव्र भुमिका राहणार आहे, असे जयंत पाटील यांनी सांगितले.
जनसुरक्षा विधेयकाविरोधात एल्गार
सर्वसामान्यांची गळचेपी करणाऱ्या जनसुरक्षा विधेयकाविरोधात शेकापसह वेगवेगळ्या संस्था, संघटनांनी एल्गार सूरू केला आहे. मूंबईत झालेल्या विराट मोर्चाला राजकीय, सामाजिक अशा अनेक क्षेत्रातील तज्ञ मंडळींसह कार्यकर्त्यांनी सहभागी होऊन जनसूरक्षा विधेयक हटाव, अशा घोषणा दिल्या. काहींनी काळ्या फिती लावून तर काही वेगवेगळे विरोधातले फलक लावून जन सुरक्षा विधेयकाविरोधात आवाज उठविला.
इंदिरा गांधींनी सांगून आणीबाणी लावली. मात्र गेल्या 10 वर्षांपासून अघोषित आणीबाणी आहे, त्याचा विरोध कोण करणार? या अधिवेशनामध्ये हे महाराष्ट्र कायदा सुरक्षा विधेयक आणू इच्छित आहेत. त्यांच्याकडे पाशवी बहुमत आहे. मात्र रस्त्यावर आमची सत्ता आहे. हे विधेयकह आणून तुमच्या राजकीय विरोधकांना नक्षलवादी ठरवण्याचे स्वप्न बघु नका. महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात याला विरोध करु.
उद्धव ठाकरे,
शिवसेना प्रमुख
