| पनवेल | प्रतिनिधी |
महाविकास आघाडीमध्ये मजबुती आणण्यासाठी आणि मोदी सरकारला खाली खेचण्यासाठी सर्वांनी एकदिलाने काम केले पाहिजे, असे आवाहन पिंपरी चिंचवड महापालिकेचे माजी महापौर संजोग वाघेरे यांनी पनवेल येथे केले. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून महाविकास आघाडीची मावळ मतदारसंघाची उमेदवारी जाहीर झाली आहे. यावेळी वाघेरे यांनी पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेण्यावर भर दिला असून, स्वतःचा परिचय देऊन महाविकास आघाडीच्या सर्वपक्षीय पदाधिकार्यांची मने जिंकली.
आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड महापालिकेचे माजी महापौर संजोग वाघेरे यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून महाविकास आघाडीची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर महाविकास आघाडीच्या नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची भेट घेऊन महाविकास आघाडीचे संघटन अधिक मजबूत करण्याचा मानस त्यांनी आखला आहे. या पार्श्वभूमीवर संजोग वाघेरे यांनी शुक्रवारी पनवेलमध्ये शेतकरी कामगार पक्ष कार्यालयात नेत्यांसह पदाधिकार्यांची भेट घेतली, तसेच काँग्रेस भवन येथे काँग्रेस नेत्यांची आणि कळंबोली येथे राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या पदाधिकार्यांची भेट घेतली.
यावेळी त्यांच्यासोबत शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख बबनदादा पाटील, जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार मनोहर भोईर, जिल्हाप्रमुख शिरीष घरत या नेत्यांनी शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार बाळाराम पाटील, माजी आदर्श नगराध्यक्ष जे.एम. म्हात्रे, पनवेल विधानसभा अध्यक्ष काशिनाथ पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नारायण घरत, तालुका चिटणीस राजेश केणी, महानगर चिटणीस गणेश कडू यांच्यासह कार्यकर्त्यांची भेट घेतली. यानंतर काँग्रेस भवन येथे त्यांनी ज्येष्ठ नेते जी.आर पाटील, काँग्रेसचे पनवेल अध्यक्ष सुदाम पाटील, शशिकांत बांदोडकर यांच्यासह पदाधिकार्यांची भेट घेतली. तर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सतीश पाटील, युवक अध्यक्ष शाहबाज पटेल आदींसह पदाधिकार्यांची भेट घेतली. यावेळी इंडिया आघाडीच्या पदाधिकार्यांनी एकत्रित राहून एकदिलाने देशात मोदी सरकारला खाली खेचण्यासाठी तयारी केली पाहिजे आणि त्याची सुरुवात ही मावळ लोकसभेच्या निर्णयावरून देशाला दाखविली पाहिजे, असे काम करण्याचे आवाहन केले.
ठाकरे गटात प्रवेश केलेले संजोग वाघेरे यांची मावळमधील उमेदवारी निश्चित झाली. महायुतीत मतदारसंघ शिवसेनेला सुटला असल्याने मावळमध्ये दोन्ही शिवसेनेत आणि पिंपरी-चिंचवडमधील उमेदवारांमध्ये लढत होण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कट्टर समर्थक आणि पवार कुटुंबियांशी निष्ठावंत अशी ओळख असलेले संजोग वाघेरे यांनी शिवबंधन बांधत ठाकरे गटात प्रवेश केला. पिंपरी विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव असल्याने वाघेरे यांची लोकसभा निवडणूक लढविण्याची इच्छा आहे. त्यांनी 2014 आणि 2019 मध्येही तयारी केली; पण, त्यांना संधी मिळाली नाही. 2014 मध्ये राहुल नार्वेकर आणि 2019 मध्ये पार्थ पवार यांना राष्ट्रवादीची उमेदवारी मिळाल्याने वाघेरे यांना माघार घ्यावी लागली होती. शिवसेनेतील फुटीनंतर ठाकरे गटाला मावळमधून सक्षम उमेदवार पाहिजे होता, हीच संधी साधत वाघेरे यांनी ठाकरे गटात प्रवेश केला. उमेदवारीच्या अटीवरच वाघेरे यांचा प्रवेश झाला. अद्याप निवडणूक जाहीर झाली नाही. त्यामुळे एकट्याचे नाव जाहीर करणार नाही, पण उत्साह बघून तुम्ही समजू शकता असे सांगत ठाकरे यांनी वाघेरे यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केल्याचे स्पष्टपणे सांगितले होते.
याच पार्श्वभूमीवर संजोग वाघेरे यांनी मावळ लोकसभा क्षेत्रातील इंडिया आघाडीच्या सर्वच मित्रपक्षांच्या भेटीगाठी सुरू केल्या. शुक्रवारी ते पनवेलमधील तीनही मित्रपक्षांच्या भेटीला आले असताना त्यांनी आपला परिचय करून देत मावळ लोकसभा क्षेत्रातील संघटन वाढीसाठी सर्वच पक्षांनी आपापल्या परीने अधिक जोमाने कामाला लागण्याची गरज असे कार्यकर्त्यांना आवाहन देखील केले.