सनियंत्रण समिती, नगरपरिषदेचे दुर्लक्ष
| माथेरान | वार्ताहर |
माथेरान हे पर्यटनस्थळ 2003 मध्ये संवेदनशील क्षेत्र घोषित झाल्यापासून सनियंत्रण समितीच्या परवानगीशिवाय कोणत्याही प्रकारची बांधकामे पूर्ण करता येत नाहीत. परंतु, या सर्व बाबींना तिलांजली देत बिनधास्तपणे झाडे कापून सर्रासपणे बांधकामांचा सपाटा लावला आहे. अवैधपणे बांधकामे सुरू असताना संबंधित विभागाकडून कोणतीही कारवाई होत नसल्याने नागरिकांकडून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान, जैन मंदिराच्या बाजूला असलेल्या जागेत हॉटेल उषा एस्कॉटच्या माध्यमातून बिनधास्तपणे अडथळा ठरणारी झाडे कापून त्याठिकाणी बांधकाम सुरू ठेवले आहे. याबाबत विविध वर्तमानपत्रात वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते. तेव्हा कुठे वनखात्याकडून कारवाई केली होती. परंतु, नगरपरिषदेच्या कार्यालयात संबंधित अधिकारी नाहीत. जे बांधकाम खात्याचे अधिकारी होते, त्यांची कर्जतला बदली झाली असून, माथेरानचा प्रभारी कारभार पाहात आहेत. त्यामुळे नगरपरिषदेच्या अथवा वनखात्याच्या जागेत सर्वत्र बांधकामांचा सपाटा सुरू आहे.
यावर अंकुश ठेवण्यासाठी नगरपरिषदेच्या कार्यालयात अधिकारी नाही. अवैध बांधकामे सुरू असताना सनियंत्रण समितीचे सदस्य मात्र शांत असल्याने उलटसुलट चर्चा माथेरामध्ये सुरू आहेत. कारण, जर सर्वसामान्य माणसाने बांधकाम करण्यास सुरुवात केल्यास, त्यास नगरपरिषद आणि वनखात्यामार्फत बंदी केली जाते, मग धनाढ्य लोकांना यात सूट का दिली जाते. या सर्व कामांवर संबंधित अधिकारी हेतुपुरस्सर कानाडोळा करीत आहेत, असा आरोप नागरिकांकडून होत आहे.