| आगरदांडा | प्रतिनिधी |
भारत देश 15 ऑगस्ट 1947 रोजी ब्रिटीश राजवटीतून स्वतंत्र झाला. तथापि काश्मिर, जुनागड, हैदराबाद आणि जंजिरा संस्थान सारख्या संस्थानिकांनी सामिल नाम्यावर स्वाक्षरी करताना खूप वेळ घेतला होता. त्यामुळे मुरुड, श्रीवर्धन व म्हसळा या तीन तालुक्यांना 31 जानेवारी 1948 रोजी खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य मिळाले. जंजिऱ्याच्या नवाबाने तत्कालीन मुख्यमंत्री बा.ग. खैर यांची मुंबई येथे भेट घेऊन शामिल नाम्यावर सही केली. तेव्हापासून हे तीन तालुके भारतात समाविष्ठ झाले होते. त्यामुळे 31 जानेवारी हा दिवस जंजिरा संस्थान मुक्ती संग्राम दिन म्हणून साजरा करण्यात येतो. यावेळी मुरुड तालुका पत्रकार संघ व रायगड प्रेस क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने जंजिरा मुक्ती संग्राम दिन मोठ्या उत्सहात साजरा करण्यात आला.
आझाद चौकात मुरुड नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा आराधना मंगेश दांडेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या कार्यक्रमासाठी मुरुड तहसीलदार आदेश डफळ, पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे, उपनगराध्यक्ष वीरेन भगत, फादर बोनाव्हेंचर नुनीस, माजी तहसीलदार नयन कर्णिक, माजी नगराध्यक्ष मंगेश दांडेकर, नगरसेविका प्रांजली मकू, नगरसेवक आदेश दांडेकर, प्रमोद भायदे, नगरसेवक पांडुरंग आरेकर, श्रीकांत खोत, डॉ. राज कल्याणी, रायगड प्रेस क्लब अध्यक्ष प्रशांत गोपाळे, वासंती उमरोटकर, प्रकाश राजपुरकर, मुरुड तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष सिराज शेख, भारत रांजणकर आदींसह सरएसए हायस्कूल व ओंकार विद्या मंदीर उच्च माध्यमिक शाळेचे विद्यार्थी, प्राचार्य, शिक्षक वृंद व विद्यार्थी उपस्थित होते.







