माणगावात जनजीवन विस्कळीत

| माणगाव | वार्ताहर |

माणगावसह तालुक्यात गेली दोन दिवस आभाळ फाटल्यागत मुसळधार धो-धो पाऊस पडत असल्याने नागरिकांचे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. या मुसळधार पावसामुळे वातावरणात गारवा जाणवत आहे. दमदार विश्रांती नंतर पाऊस सक्रिय झाल्याने दोन दिवस सतत पडत असलेल्या मुसळधार पावसाने नागरिकांचे जनजीवन पूर्ण विस्कळीत झाले आहे. माणगाव तालुक्यात अनेक नद्यांना पूर आला असून माणगावातील काळ नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने नागरिकांतुन भीती व्यक्त होत आहे. कोणतीही नैसर्गिक आपत्ती घडू नये म्हणून माणगाव महसूल खात्याकडून दक्षता बाळगली जात आहे. माणगाव तहसीलदार विकास गारुडकर यांनी सर्व यंत्रणा सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत.

तालुक्यात मंगळवार व बुधवारी सलग दोन दिवस मुसळधार पावसाने हजेरी लावली. याअगोदर काही दिवस हलकासा पाऊस पडल्याने वातावरणात उष्मा जाणवत होता. सोमवारी सकाळ पासूनच पावसाने हजेरी लावल्यावर वातावरणात गारवा निर्माण होऊन पावसाने शेतकरी राजा सुखावला असून लावणीच्या कामांना वेग आला आहे. मात्र नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. बहुतांशी दुकाने सुरु असल्याने नागरिक खरेदीसाठी दुकानात येत होते. अतिवृष्टीमुळे नागरिकांनी बाजारात खरेदीसाठी न येणे पसंत केले. त्यामुळे जीवन पूर्ण विस्कळीत झाले. या मुसळधार पावसामुळे महामार्गावर वाहतूक तुरळक चालू होती.

Exit mobile version