| मुंबई | वृत्तसंस्था |
महाराष्ट्रात पडत असलेल्या अतीमुसळधार पाऊसामुळे कुठे ही आपत्कालीन परिस्थिती उद्धभवू नये यासाठी सर्व यंत्रणांना सतर्क रहाण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदेश दिले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलिस अधिक्षक, राज्यातील सर्व महापालिका आयुक्त आणि आप्तकालिन यंत्रणांच्या प्रमुखांशी फोनवरून चर्चा करत सर्व यंत्रणांना सतर्क रहाण्याचा आदेश यावेळी देण्यात आले आहेत. मुसळधार पावसामुळे चंद्रपूर जिल्ह्यात चिचपल्ली गावातील शेकडो घरे पाण्याखाली तसेच, गडचिरोली जिल्ह्यात 100 हुन अधिक गावांचा संपर्क तुटला आहे.गोंदिया जिल्ह्यात पाणी पातळीत वाढ झाली आहे.
मुंबईसह कोकणातही मुसळधार पाऊस
मुंबईमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. मुंबई आणि उपनगरात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा मंत्रालयाच्या नियंत्रण कक्षातून देण्यात आला आहे. नागरिकांनी आवश्यक असेल तरच बाहेर पडण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात चिचपल्ली गावातील शेकडो घरे पाण्याखाली
चंद्रपूर जिल्ह्यात पावसाने कहर केल्याचे बघायला मिळाले आहे. सलग दोन दिवस पाऊस झाल्याने आज पहाटे चंद्रपूर-मूल मार्गावरील चिचपल्ली गावातील गावतलाव फुटल्याने गावातील अंदाजे 100 ते 150 घरांमध्ये पाणी शिरून पाण्यामुळे शेकडो घरे पाण्याखाली गेली आहे. यात अनेक जनावरांचा मृत्यू झाला आहे. तर शेतकऱ्यांनी शेतीसाठी घरात आणून ठेवलेले खत आणि बी-बियाणेही पाण्यात भिजली आहेत. शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक आणि वित्त हानी झाल्याचे चित्र आहे.
गडचिरोली जिल्ह्यात 100 हुन अधिक गावांचा संपर्क तुटला
गडचिरोली जिल्ह्यात पाऊसाच जोर काही भागात कमी झाला असला तरी पार्लकोटा नदीला कालपासून पूर आला आहे. त्यामुळे जिल्हा मुख्यालयाशी भामरागड तालुक्यातील 100हुन अधिक गावांचा कालपासून थेट संपर्क तुटला आहे. तर भामरागड जलमय झालं आहे. सद्याची स्थिती बघितली तर भामरागड शहरातील मुख्य बाजारपेठापर्यत पुराचं पाणी शिरलं आहे. त्यामुळे 50हुन अधिक दुकाने, घरे पाण्याखाली आले आहेत. जिल्ह्यातील बंद झालेले रस्त्यांची स्थिती बांघितल तर 4 मुख्य महामार्ग बंद झाले आहेत, तर 26 छोटे मार्ग वाहतुकीसाठी बंद झाले आहेत.
छत्तीसगढ राज्यात पडत असलेला जोरदार पाऊस आणि गोसेखुर्द धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू असल्यामुळे जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे जिल्ह्या प्रशासन आणि पोलीस प्रशासन सज्ज असून जिल्ह्यात सगळीकडे आपत्ती व्यवस्थापनची टीम नजर ठेवून आहे.
गोंदिया जिल्ह्यात पाणी पातळीत वाढ
गोंदिया जिल्ह्यात आज मुसळधार पाऊस सुरू असल्याने गोंदिया जिल्ह्यातील नदी-नाल्यासह धरणाच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाली आहे. मुसळधार पावसामुळे भंडारा जिल्ह्यात सर्वत्र जलमयस्थिती निर्माण झालेली आहे. अशात जिल्ह्यातील अनेक मार्ग बंद आहेत. तर, गोसीखुर्द धरणावर पर्यटकांनाही बंदी करण्यात आलेली आहे.