विवाहितेला जाळून मारल्याप्रकरणी नवर्‍यासह सासूला जन्मठेप

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।

हुंड्यासाठी छळ करून पत्नीला जाळून तिची हत्या केल्याप्रकरणी पनवेल तालुक्यातील कासारभट येथील पिडितेच्या पतीसह सासूला जन्मठेपेची शिक्षा अतिरिक्त सत्र न्यायाधीश जे. डी.वडणे यांनी ठोठावली आहे. तसेच 60 हजार रुपयांचा दंड देखील आकारण्यात आला आहे. निलेश रामकृष्ण म्हात्रे व सासू मालती रामकृष्ण म्हात्रे या दोघांनी विवाहित महिला ज्योती हिचा अमानुष छळ केला. तसेच तिला जाळून तिचा खुन केल्याप्रकरणी त्यांना शिक्षा सुनावण्यात आली.

पेण तालुक्यातील रावे येथील ज्योती हिरामण टावरी हीचा विवाह पनवेल तालुक्यातील कासारभट येथील निलेश म्हात्रे याच्यासोबत 2 मे 2015 रोजी झाला होता. लग्न झाल्यावर काही दिवस सासरच्या मंडळीनी तिला व्यवस्थित नांदविले; मात्र त्यानंतर नवरा, सासू, सासरे व नणंदानी तिचा अमानुष छळ करण्यास सुरूवात केली. निलेश ज्योतीला फ्लॅट घेण्यासाठी हुंडा म्हणून माहेरून पैसे आणायला सांगत असे. घरची आर्थिक परिस्थिती ठीक नसल्यामुळे तिला पैसे आणणे शक्य नव्हते. अखेर 20 ऑक्टोबर 2015 रोजी आरोपीने किचनमध्ये तिच्या अंगावर रॉकेल टाकून तिला जिवंत जाळले व दरवाज्याची कडी लावून ते पसार झाले. याबाबतची माहिती मिळताच ज्योतीचे वडील हिरामण टावरी घटनास्थळी आले. त्यांनी याबाबत पनवेल पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात तक्रार दाखल केली.

या प्रकरणी पनवेल पोलिसांनी तपास करुन आरोपींविरोधात दोषारोप दाखल केले. सरकार पक्षातर्फे सहायक सरकारी वकील अ‍ॅड वाय. एस. भोपी यांनी एकूण 12 साक्षीदार तपासले व जोरदार युक्तिवाद केला. दोन्ही पक्षाचा युक्तिवाद ऐकून कोर्टाने नराधमांना शिक्षा सुनावली.

Exit mobile version