| मुंबई | प्रतिनिधी |
मुंबईचे माजी पोलीस अधिकारी आणि एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्यावरील आरोप सिद्ध झाले आहेत. मुंबई उच्च न्यायालयाने प्रदीप शर्मा यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. 2006 च्या लखन भैया एन्काऊंटर प्रकरणाशी संबंधित अनेक याचिकांवर मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी निर्णय दिला आहे. न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि न्यायमूर्ती गौरी गोडसे यांच्या खंडपीठाने 8 नोव्हेंबर 2023 रोजी या 2006 मध्ये दाखल केलेल्या 16 अपिलांच्या सुनावणीवर निकाल राखून ठेवला होता.
2006 मध्ये झालेल्या लखन भैय्या एन्काऊंटरची चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर ती चकमक बनावट असल्याचं एसआयटी चौकशीत उघड झालं. लखन भैया (33, रा. वसई), खरे नाव रामनारायण गुप्ता, त्याच्याविरुद्ध गँगस्टर अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. 11 नोव्हेंबर 2006 रोजी मुंबई पोलिसांच्या पथकाने छोटा राजन टोळीचा संशयित सदस्य म्हणून त्याला ताब्यात घेतलं होतं. त्याच दिवशी संध्याकाळी लखन भैय्याचा मृत्यू पश्चिम मुंबईतील वर्सोवा येथे चकमकीत झाला. या कथित बनावट चकमकीचे नेतृत्व माजी प्रदीप शर्मा यांनी केले होते.