माणगाव सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
| माणगाव | प्रतिनिधी |
महाड तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना दि. 13 मार्च 2020 रोजी नागाव फाटा येथे मयताचे राहत्या घरी घडली होती.
या घटनेची थोडक्यात हकीकत अशी की, मयत शकुंतला चंद्रकांत सकपाळ (70) हिला आरोपी तिचा मुलगा मधुकर चंद्रकांत सकपाळ याला पुण्याला जायला आईने पैसे दिले नाहीत याचा राग मनात धरून त्याने तिला शिवीगाळी करून सतत तीन दिवस हाताबुक्क्याने शरीरावर व गुप्तांगावर मारहाण केली. तसेच तिचे डोके भिंतीवर आपटून, कपाळावर लोखंडी कोयत्याने जोरात फटका मारून जखमी करून जिवे ठार मारले होते.
याबाबत महाड तालुका पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक नितीन गवारे यांनी करुन सदरचे दोषारोप पत्र जिल्हा व सत्र न्यायालय माणगाव येथे दाखल केले. या खटल्याची सुनावणी अति. सत्र न्यायालय, माणगाव-रायगड येथे झाली. सदर गुन्ह्यात आरोपीचे वडील चंद्रकांत सकपाळ व चंद्रकांत आरेकर यांची साक्ष महत्त्वाची ठरली. या खटल्यामध्ये अति. शासकीय अभियोक्ता जितेंद्र म्हात्रे यांनी सरकार पक्षाच्या वतीने काम पाहिले व कोर्टासमोर प्रभावीपणे युक्तिवाद करून महत्त्वाचे न्यायनिर्णय दाखल केले. या केसच्या सुनावणीदरम्यान पैरवी अधिकारी यू.एल. धुमास्कर, पोलीस उपनिरीक्षक सी. छाया कोपनर, पो.ह. शशिकांत कासार, पोहवा शशिकांत गोविलकर, सोमनाथ ढाकणे यांनी सहकार्य केले. तसेच सत्र न्यायाधीश एन.एस. कोले यांनी सदर घटनेतील गुन्ह्याच्या शाबीतीनंतर आरोपी मधुकर चंद्रकांत सकपाळ यास दोषी ठरवून दि. 27 मार्च रोजी भा.द.वि.सं. कलम 302 अन्वये जन्मठेप व रू. 1000/- दंड व दंड न भरल्यास एक महिना साध्या कैदेची शिक्षा ठोठावली.