खूनप्रकरणी जन्मठेप

माणगाव न्यायालयाने ठोठावली शिक्षा

| अलिबाग | प्रतिनिधी |

किरकोळ वादातून सहकाऱ्यावर चाकूने हल्ला करून त्याला जखमी केले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्यामुळे आरोपी कृष्णा खेळोजी याला दोषी ठरवत न्यायालयाने त्याला खून केल्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी कृष्णा खेळोजी आणि मयत तुकाराम कावळे यांच्यामध्ये होडीमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाले होते. श्रीवर्धन तालुक्यातील दिघी कोळीवाडा येथे 4 नोव्हेंबर 2021 रोजी पहाटे साडेबारा वाजण्याच्या सुमारास आरोपी कृष्णा खेळोजी याने मयत तुकाराम याच्यावर चाकूने जीवघेणा हल्ला केला. त्याच्या चेहऱ्यावर छाती व पाठीवर चाकूने वार केला. त्यामध्ये तो गंभीर जखमी झाला. सरकारी दवाखान्यात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

याप्रकरणी दिघी सागरी पोलीस ठाण्यात कृष्णा याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीसन निरीक्षक एस.ए. पोमन यांनी करीत आरोपीविरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या खटल्याची सुनावणी माणगावमधील अतिरिक्त सह जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्या न्यायालयात झाली. प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, वैद्यकीय अधिकारी यांची साक्ष महत्त्वाचा पुरावा ठरला. या खटल्यामध्ये अतिरिक्त शासकीय अभियोक्ता योगेश तेंडुलकर यांनी सरकारी वकील म्हणून काम पाहिले. विशेष व सत्र न्यायाधीश यु.टी. पोळ यांनी या घटनेतील गुन्हा सिद्ध झाल्यानंतर आरोपीला खून केल्याप्रकरणी दोषी ठरवून जन्मठेप अशी शिक्षा सुनावली.

Exit mobile version