माणगाव सत्र न्यायालयाचा निर्णय
| माणगाव | प्रतिनिधी |
चुलत भावाचा खून केल्याप्रकरणी आरोपीस जन्मठेपेची शिक्षा माणगाव सत्र न्यायालयाने सुनावली आहे. ही घटना मजगाव बौद्धवाडी, ता. तळा, जि. रायगड येथे फिर्यादी हिरामण उर्फ हिरानंद पांडुरंग जगताप व पुतण्या आरोपी रवि जगताप यांच्या राहत्या घराच्या पडवीत दि. 16 फेब्रुवारी 2019 रोजी 3.30 ते 7.28 च्या दरम्यान म्हसळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली होती.
या घटनेची थोडक्यात हकीकत अशी की, दि. 16 फेब्रुवारी 2019 रोजी दुपारी 3.30 वाजताच्या सुमारास आरोपी रवि उर्फ रवींद्र सोनू जगताप (38), रा. मजगाव बौध्दवाडी, ता. तळा, जि. रायगड याने फिर्यादी हिरामन उर्फ हिरानंद पांडुरंग जगताप, रा. मजगाव बौद्धवाडी, ता. तळा, जि. रायगड याच्याशी नारळाची झाडे तोडली यावरून झालेल्या वादाचा व फिर्यादी यांची पत्नी शिवीगाळी करते याचा राग मनात धरून फिर्यादी यांचा मुंबईहून आलेला मुलगा दिपक हिरामन जगताप यांस चाकू व कोयत्याने खाद्यावर व पोटावर वार करून, जिवे ठार मारले.
या घटनेची फिर्याद म्हसळा पोलीस ठाणे दिल्यानंतर गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याचा तपास पी.ए. कोल्हे, सहा. पोलीस निरीक्षक, म्हसळा पोलीस ठाणे यांनी केला. या खटल्याची सुनावणी मा. अति. जिल्हा व सत्र न्यायाधीश साो., माणगाव-रायगड येथे झाली. सदर खटल्यामध्ये जितेंद्र म्हात्रे अति. शासकीय अभियोक्ती यांनी सरकार पक्षाच्या वतीने काम पाहिले व याकामी प्रत्यक्षदर्शी साक्षीदार तपासून कोर्टासमोर प्रभावीपणे युक्तिवाद करून महत्त्वाचे न्यायनिर्णय दाखल केले. सदर केसच्या सुनावणीदरम्यान पैरवी अधिकारी दिनेश आघाव, पोलीस उपनिरीक्षक, छाया कोपनर मपोह, शशिकांत कासार सहा. फौजदार, शशिकांत गोविलकर पोह 879, सोमनाथ ढाकणे पोशि 462 यांनी सहकार्य केले. तसेच मा. जिल्हा व सत्र न्यायाधीश हर्षल भालेराव यांनी सदर घटनेतील गुन्ह्याच्या शाबीतीनंतर यांनी सदर घटनेतील आरोपीला दि. 06 ऑगस्ट रोजी दोषी धरून जन्मठेप व दंडाची रक्कम 15000/- रु.ची शिक्षा ठोठावली. याप्रकरणी मयत दिपक जगताप यास न्याय मिळाला म्हणून त्याच्या आई-वडिलांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.