। अलिबाग । प्रतिनिधी ।
अलिबाग शहरातील महावीर चौकाजवळ दोन गटांमध्ये भरदिवसा राडा झाला. यामध्ये दोघांना गंभीर दुखापत झाली आहे. ही घटना शनिवारी (दि.3) सायंकाळी घडली. याप्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किरकोळ कारणावरून हा वाद झाल्याची माहिती समोर येत आहे.
अलिबाग स्थानकापासून हाकेच्या अंतरावर असलेला महावीर चौक नेहमीच गजबजलेला असतो. शनिवारी संध्याकाळी हा चौक नागरिकांनी गजबजलेला होता. काहीजण बाजारात खरेदीला जात होते, तर काहीजण त्यांच्या घरी जाण्याच्या तयारीत होते. त्यावेळी अचानक सायंकाळी किरकोळ कारणावरून दोन गटात राडा झाला. एकमेकांना शिवीगाळी करून मारहाण करण्यास सुरुवात केली. सोडविण्यास गेलेल्या एका व्यक्तीलादेखील त्यांनी हाताबुक्क्याने मारहाण केली. शहरातील नागरी सुरक्षेसाठी अलिबाग शहरात ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहे. अलिबाग पोलीस ठाण्यात त्याचे नियंत्रण कक्ष ठेवले आहे. मात्र, हा प्रकार पोलिसांच्या निदर्शनास का आला नाही, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे. एका स्थानिकाने पोलिसांना फोन करून या घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतल्याची माहिती समोर येत आहे.
या मारहाणीत दोघेजण जखमी झाले असून, ते दवाखान्यात उपचार घेत आहेत. शहरात भरदिवासा घडणार्या गुंडगिरीला रोखण्यास पोलीस निरीक्षक किशोर साळे यशस्वी ठरतील का, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.