श्रीवर्धन न्यायालयाच्या इमारतीचे आयुष्य धोक्यात

ठेकेदाराकडून बांधकामात निकृष्ट दर्जाच्या लोखंडी सळ्यांचा वापर

| श्रीवर्धन | वार्ताहर |

श्रीवर्धन शहरातील गणेश आळी परिसरात श्रीवर्धन न्यायालयाच्या इमारतीचे व न्यायाधीशांच्या निवासस्थानाच्या इमारतीचे बांधकाम सुरू करण्यात आलेले आहे. सदर न्यायालयाच्या बांधकामाचा मुहूर्त व भूमीपूजन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती व रायगड जिल्ह्याचे पालक न्यायाधीश मिलिंद साठे यांच्या हस्ते करण्यात आले होते. त्यानंतर पावसाळा सुरू झाल्याने ठेकेदाराने बांधकाम पावसाळा संपल्यानंतर सुरू केले आहे.

या बांधकामाच्या ठिकाणी खोदकाम केल्यानंतर पाणीदेखील लागले आहे व संपूर्ण जमिनीमध्ये वाळू सापडत आहे. मात्र, या ठिकाणी काम करणार्‍या ठेकेदाराकडून निकृष्ट दर्जाच्या लोखंडी सळ्या वापरण्यात येत असल्याचे प्रथमदर्शनी लक्षात येत आहे. न्यायाधीश निवासस्थानाच्या ठिकाणी ठेकेदाराने सळ्या उभ्या केल्या आहेत, त्यांना मात्र रंग लावलेला दिसत आहे. मात्र, नुसता रंग न लावता अँटी-रेस्टेड पेंट किंवा इपॉक्सी लावून सळ्यांचा वापर करणे आवश्यक आहे. सदर ठेकेदाराकडून निकृष्ट दर्जाच्या सळ्या वापरल्या गेल्यास इमारतीचे आयुष्य निश्‍चितपणे कमी होणार आहे.

तरी संबंधित विभागाने त्या ठिकाणी वापरण्यात येणार्‍या लोखंडी सळ्या उत्तम दर्जाच्या वापरण्यासाठी ठेकेदाराकडे पाठपुरावा करणे गरजेचे आहे. ज्यावेळी श्रीवर्धन येथे न्यायालय सुरू झाले त्यावेळी दाबक पाखाडी परिसरात एका चाळीमध्ये भाड्याच्या खोलीत न्यायालय सुरू झाले होते. परंतु, सदर चाळ मोडकळीस आल्यानंतर श्रीवर्धन नगरपरिषदेसमोर असलेल्या जुन्या स्टेट बँक असलेल्या इमारतीमध्ये कोर्टाचे कामकाज हलविण्यात आले. परंतु, सदरची जागा रस्त्याला लागूनच असल्यामुळे त्या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था व ध्वनी प्रदूषणाचा आवाज ही समस्या फार मोठ्या प्रमाणावर जाणवत असल्याने श्रीवर्धनमधील वकिलांनी न्यायालयाला स्वतःची इमारत व जागा मिळावी यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. तरी सदर इमारतीचे बांधकाम चांगल्या दर्जाचे व्हावे यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग त्याचप्रमाणे वकील संघटनेने लक्ष द्यावे.


श्रीवर्धन गणेश आळी येथील न्यायालयाच्या बांधकामाच्या ठिकाणी तक्रार झाल्यानंतर कार्यकारी अभियंता यांनी भेट दिली. तसेच, त्या ठिकाणी वापरण्यात येणारे स्टील बाजूला करून नवीन स्टील वापरण्याच्या सूचना दिल्या आहेत.

तुषार लुंगे, उपविभागीय अभियंता,
सार्वजनिक बांधकाम उपविभाग, श्रीवर्धन
Exit mobile version