रोहा-बारशेत मार्गावर जीवघेणा प्रवास

| चणेरा | प्रतिनिधी |

विकासाच्या घोषणा आणि निधीच्या आकड्यांमध्ये ग्रामीण भागाचा विकास कुठे आहे, असा संतप्त सवाल आता रोहा तालुक्यातील नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. रोहा ते बारशेत हा अनेक गावांना जोडणारा महत्त्वाचा मार्ग सध्या अक्षरशः जीवघेणा बनला असून, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

दरम्यान, रोहा ते बारशेत मार्गावर तांबडी, निवी ठाकूरवाडी, सवाणे, गौळवाडी, म्हसाडी, बारशेत, वाली यांसह अनेक गावांची वाहतूक अवलंबून आहे. विद्यार्थी, शेतकरी, कामगार, एसटी आणि अन्य वाहने याच मार्गाने नियमित ये-जा करतात. त्यामुळे हा रस्ता ग्रामीण भागासाठी जीवनवाहिनी असताना त्याची अवस्था मात्र, अत्यंत दयनीय झाली आहे.

या मार्गावर काही दिवसांपूर्वी तब्बल दोन ते तीन फूट खोल आणि मोठ्या आकाराचा खड्डा पडला आहे. विशेष म्हणजे या खड्ड्याच्या दोन्ही बाजूंनी रस्त्याची अवस्था धोकादायक झाली असून मोठमोठे दगडवर आले आहेत. रात्रीच्या अंधारात हा खड्डा वाहनचालकांच्या लक्षात न आल्यास दुचाकीस्वार किंवा चारचाकी वाहन त्यात आदळून गंभीर अपघात होण्याची शक्यता आहे. प्रशासनाने आणखी किती खोल खड्डा पडण्याची आणि एखाद्याचा जीव जाण्याची वाट पाहायची? असा संतप्त सवाल नागरिक करत आहेत.

गौळवाडी गावासमोर तर परिस्थिती अधिकच गंभीर आहे. रस्त्यावरील मोठी मोरी खचली असून, तिच्या दोन्ही बाजूंना दोन ते तीन फूट खोल मोठमोठे होल पडले आहेत. वाहनचालकांनी थोडीशी चूक केली तरी वाहन थेट या खड्ड्यांमध्ये जाण्याची शक्यता आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी या मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी हा रस्ता अक्षरशः मृत्यूचा सापळा ठरत आहे.

एखादी दुचाकी या खड्ड्यात गेल्यास गंभीर दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. रस्त्याच्या कडेला साईडपट्ट्या नाहीत, अनेक ठिकाणी डांबर पूर्णपणे उखडले आहे आणि मोठमोठे दगड रस्त्यावर आले आहेत. पावसाळ्यात परिस्थिती आणखी बिकट झाली असून वाहनचालकांना अक्षरशः कसरत करत मार्ग काढावा लागत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी या मार्गाची प्रत्यक्ष पाहणी केली आहे का? केली असेल तर ही परिस्थिती अद्याप का कायम आहे? असा थेट सवाल आता ग्रामस्थ करत आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने केवळ कागदोपत्री पाहणी न करता प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन तातडीने उपाययोजना करावी. एखादा मोठा अपघात घडल्यानंतर पंचनामा, पाहणी आणि आश्वासन देण्यापूर्वीच प्रशासन खडबडून जागे होणे गरजेचे आहे. नागरिकांचा जीव गेल्यानंतर रस्ता दुरुस्त करण्यापेक्षा, जीव वाचवण्यासाठी रस्ता आजच दुरुस्त करा! अशी संतप्त मागणी रोहा तालुक्यातील ग्रामीण भागातून होत आहे.

रस्त्याच्या स्थितीची माहिती आहे. गौळवाडीसमोरील मोरी खचल्याची माहिती नाही. माहिती मिळताच तातडीने संबंधितांना दुरुस्तीचे आदेश देणार आहे. तसेच पावसाळा संपल्यानंतर रस्त्याचे काम हाती घेण्यात येणार आहेत.

अरुण पाटील
सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता
Exit mobile version