| नेरळ | प्रतिनिधी |
नेरळ पोलीस ठाणे हद्दीत वंजारपाडा गावात तलवारीने जीवघेणा हल्लाची घटना घडली. यात एक जण गंभीर जखमी झाला आहे. या प्रकरणातील चौघांना पोलिसांनी अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वंजारपाडा येथील गणपती मंदिराजवळील नाका परिसरात तक्रारदार महिला, जखमी साक्षीदार व आरोपी हे सर्वजण एकाच गावातील रहिवासी आहेत. जखमी हा तक्रारदार यांचा भाऊ असून, संबंधित जखमी व्यक्ती घराबाहेर बसलेली असताना आरोपी तेथे येऊन विनाकारण शिवीगाळ करू लागला. यावेळी तक्रारदार महिलेने मध्यस्थी करून वाद सोडवण्याचा प्रयत्न करत दोघांनाही घरी जाण्यास सांगितले. मात्र, याच रागातून आरोपी घरी जाऊन तलवार घेऊन परत आला व तक्रारदार महिलेला शिवीगाळ करत तिच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर जखमी साक्षीदार मोटारसायकल वरून घरी जात असताना आरोपीने त्याचा पाठलाग करून डोक्यात तलवारीने वार केला.या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला असून रायगड हॉस्पिटल येथे उपचार घेत आहे.
दरम्यान, या प्रकरणातील अटकेत असलेल्या आरोपीस न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून या कालावधीत अधिक तपास करण्यात येणार आहे. याबाबत नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उप निरीक्षक भास्कर गच्चे करीत असून, घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, पोलिसांनी तात्काळ परिस्थिती नियंत्रणात आणल्याने सध्या परिसरात शांतता प्रस्थापित झाली आहे. आरोपीस चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याने पुढील तपासाला वेग येणार आहे.
नेरळजवळील वंजारपाडा येथे तरुणावर तलवारीने जीवघेणा हल्ला
