महिलेची प्रकृती चिंताजनक
| श्रीवर्धन | प्रतिनिधी |
दीड महिन्यापूर्वी श्रीवर्धनमधील बोगस डॉक्टरांचा शोध घेण्याचे आदेश जिल्हा वैद्यकीय अधिकार्यांनी दिले होते. त्यानंतरही एका बोगस डॉक्टरामुळे श्रीवर्धनमधील महिलेची मृत्यूशी झुंज सुरू असल्यामुळे ही शोधमोहीम कुचकामी ठरल्याची चर्चा होत आहे.
श्रीवर्धन तालुक्यातील एका बोगस डॉक्टरमुळे रायगड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या डॉक्टराने गर्भपातासाठी महिलेल्या दिलेल्या औषधामुळे तिची प्रकृती चिंताजनक झाली आहे. सध्या या महिलेवर श्रीवर्धन ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या बोगस डॉक्टरविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे. या प्रकरणानंतर हा डॉक्टर फरार झाला आहे. गंभीर बाब म्हणजे, गर्भपात बेकायदेशीर असूनही या महिलेने डॉक्टरकडे धाव घेतली आणि या बोगस डॉक्टरने गर्भपातासाठी तिला गोळ्या दिल्या. मात्र, चुकीच्या गोळ्या दिल्याने महिलेची प्रकृती बिघडली, तिला मोठ्या प्रमाणात रक्तस्त्रावाला तोंड द्यावे लागले. अखेर प्रकृती चिंताजनक झाल्यानंतर तिला रुग्णालयात दाखल केले आहे. ही घडना श्रीवर्धन तालुक्यातील कुडगावमधील आहे आणि या बोगस डॉक्टरचे नाव शंकर रंगराव कुंभार असे आहे.
दुसरी गंभीर बाब म्हणजे, गर्भपात बेकायदा असल्यामुळे या महिलेची ना सोनोग्राफी करण्यात आली, ना कोणतीही वैद्यकीय चाचणी करण्यात आली. तसेच, गर्भपातासाठी लागणार्या गोळ्या मेडिकल शॉपमधून आणण्यात आल्या. या महिलेला रुग्णालयात दाखल केल्यानंतर हा प्रकार समोर आला. त्यानंतर श्रीवर्धनचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष नारायणकार यांनी या बोगस डॉक्टरविरोधात दिघी सागरी पोलीस ठाण्यात तक्रार केली. बोगस डॉक्टरने दिलेल्या गोळ्यांमुळे महिलेच्या जीवाला धोका निर्माण झालाच, शिवाय गर्भपातही झाला. त्यामुळे या डॉक्टरवर कारवाई करावी, तसेच श्रीवर्धन तालुक्यातील बोगस डॉक्टरांचा शोध घ्यावा, अशी मागणी होत आहे.
कारवाईचे आदेश बासनात?
विशेष म्हणजेच, फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मनीषा विखे यांनी श्रीवर्धन तालुक्यातील बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतरही कुडगावमध्ये बोगस डॉक्टर आढळल्यामुळे एकतर बोगस डॉक्टरांचा शोध घेण्यात आला नाही किंवा थातूरमाथूर पाहणी केल्याचा संशय व्यक्त होत आहे. श्रीवर्धन तालुक्यात बोगस डॉक्टरांनी दवाखाने उघडल्याची अनेक दिवसांपासून चर्चा आहे. मात्र, याबाबत कुणीही चौकशी किंवा कारवाई करत नसल्यामुळे अशा बोगस डॉक्टरांची गर्दी दिवसेंदिवस वाढत आहे. या डॉक्टरांचे चुकीचे उपचार म्हणजे रुग्णाच्या जीवाशी खेळ होत आहे.
बोगस डॉक्टरचा बोर्ड
या बोगस डॉक्टरने लावलेल्या बोर्डवर डॉ. एस.आर. कुंभार असे नाव लिहिले आहे. तसेच डिग्री म्हणून डीएचएमएस एमडी (एएम) एमएस (काऊन्सिलिंग अँड सायकोलॉजी) असे नमूद केले आहे. तसेच नोंदणी क्रमांक 1610 असे लिहिले आहे.