आदित्य ठाकरे यांचा टोला
। मुंबई । प्रतिनिधी ।
मी जेव्हा तो व्हिडीओ पाहिला तेव्हा मला माहित नव्हते की त्यात कुणाबद्दल बोलले जात आहे. मुख्यमंत्री कुणाल कामराला माफी मागायला सांगत आहेत. पण कुणाची माफी मागायची? मुख्यमंत्री जर असं सांगत असतील तर ते देखील एकनाथ शिंदे यांना गद्दार आणि चोर मानतात का? असा टोला शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे लगावला आहे.
आदित्य ठाके म्हणाले की, गद्दार आणि चोर म्हणजे एकनाथ शिंदेच हे त्यांच्याच कार्यकर्त्यांनीच ठरवून दिले. कुणाल कामराने कुणाचंच नाव घेतले नव्हते त्यामुळे मिरची लागायचं कारण नव्हतेच. पण त्यांच्या कार्यकर्त्यांनी, टोळीनेच ठरवले की आपला बॉस गद्दार व चोर आहे. तसेच, दुसरीकडे एकनाथ शिंदेंचे खासदार त्यांची सापासोबत तुलना करतात. एवढी नाचक्की कुणाची कधीच झाली नव्हती, असाही टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला.
पुढे आदित्य ठाकरे म्हणाले की, ज्या महाराष्ट्रात नागपूर सारखी दंगल घडवण्याचा प्रयत्न झाला. ज्या मुंबईत शो चालतात तिथे तोडफोड झाली. या महाराष्ट्रात पर्यटक व गुंतवणूकदार येतील का. एकनाथ शिंदे मुख्यमंत्र्यांना अंडरमाईन करण्याचा प्रयत्न करत आहेत. तसेच, दोन महिन्यांपूर्वी मोदींनी कॉन्सर्ट इकॉनॉमीवर चर्चा केली होती. असे स्टेज वगैरे तोडल्यानंतर कॉन्सर्ट इकॉनॉमी येणार आहे का? मोदींनी तीन तासांच्या पॉडकास्टमध्ये सांगितलेले लोकशाहीत टिकाटिपण्णी गरजेची असते. त्या विचाराला धरून चालणारे एकनाथ शिंदे आहेत का? अशी तोडफोड केली म्हणून भुजबळसाहेबांवर पवार साहेबांनी कारवाई केली होती तशी कारवाई आता मुख्यमंत्री करणार आहेत का? असा सवालही आदित्य ठाकरे यांनी केला.