| पनवेल | प्रतिनिधी |
ज्येष्ठ संपादक व साहित्यिक उमाजी म. केळुसकर यांना रायगड प्रेस क्लबतर्फे ‘जीवन गौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पनवेल येथील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात झालेल्या या सोहळ्यात राज्याचे मंत्री नितेश राणे, माजी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि कमलेश सुतार यांची प्रमुख उपस्थिती होती. सुमारे 40 वर्षांच्या पत्रकारिता आणि साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल केळुसकर यांचा गौरव करण्यात आला.
‘दैनिक कृषीवल’मध्ये 25 वर्षे सहसंपादक म्हणून कार्य केल्यानंतर ते सध्या ‘साप्ताहिक कोकणनामा’चे संपादक आहेत. त्यांच्या साहित्यसंपदेत ‘इतिहासा वाक माझ्या पुढे’, ‘सम्राट’, ‘कधीतरी’ ही नाटके; ‘शिकार’, ‘अंतर्दृष्टी’, ‘खोल खोल पाणी’ हे कथासंग्रह; ‘विहिरीतले भूत’ ही कादंबरी; ‘विरह’ हा काव्यसंग्रह; ‘रायगडचे रंगकर्मी’ हा मुलाखत संग्रह तसेच ‘गोड पाण्याची विहीर’, ‘दादाच्या गोष्टी’ (भाग 1 ते 4), ‘धैर्यवान धनंजय’, ‘आकाशातील तारे’, ‘गोड गोष्टी’ हे बालसाहित्याचा समावेश आहे. त्यांनी हजारो अग्रलेख व विविध सदरांमधून लेखन करत साहित्य क्षेत्रात भरीव योगदान दिले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना यापूर्वीही अनेक मानाचे पुरस्कार प्राप्त झाले आहेत. या सन्मानाबद्दल उपस्थित मान्यवरांनी केळुसकर यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या साहित्य व पत्रकारितेतील योगदानाचे कौतुक केले.
उमाजी केळुसकर यांना ‘जीवन गौरव’
