चौधरवाडीमध्ये चार दिवसांनी आली लाईट

बैलांच्या झोंबित पडले होते पोल
। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत तालुक्यातील मोग्रज ग्रामपंचायतमधील चौधरवाडीमध्ये बैलांच्या झोम्बीत चार विजेचे खांब कोसळले होते. तेथील ग्रामपंचायत कडून सडलेले लोखंडी खांब बदलण्याची मागणी अनेक वर्षे केली होती. ते सडलेले विजेचे खांब 26 डिसेंबर रोजी रात्री कोसळले होते. त्यांनतर तब्बल चार दिवस अंधार सहन केल्यानंतर गुरुवारी नवीन विजेचे खांब उभे केल्यावर तेथील अंधार दूर झाला आहे.


मोग्रज ग्रामपंचायत मधील चौधरवाडीमध्ये 65 घरांची वस्ती आहे. तेथील आदिवासी लोकांच्या वस्तीमध्ये अनेक विजेचे खांब हे लोखंडी असून 30 वर्षांपूर्वी ते खांब टाकण्यात आले आहेत. त्यातील बहुतेक विजेच्या खांबांना गंज लागल्याने ते सडलेले आहेत. त्याबाबत तत्कालीन उपसरपंच विलास भला यांनी महावितरण कंपनीकडे नवीन खांब बसविण्याची मागणी केली होती. मात्र सडलेले विजेचे खांब महावितरण कंपनी कडून बदलण्यात येत नव्हते. त्यात 26 डिसेंबर च्या रात्री काही मोकाट जनावरे यांच्यात झोम्बी झाली आणि त्यांची झोम्बी गावातील सडलेल्या विजेच्या खांबाला जाऊन धडकली.त्यावेळी बैलांच्या धडकेत चक्क चार विजेचे खांब कोसळले आणि चौधरवाडीची वीज बंद पडली. जिल्हा परिषद सदस्या रेखा भास्कर दिसले यांनी महावितरण कंपनीच्या उपअभियंते यांना खडसावले आणि नंतर गुरुवारी नवीन विजेचे खांब घेऊन महावितरण कंपनीचे कडाव येथील शाखा अभियंता पोहचले आणि विजेचे खांब उभे करण्यास सुरुवात केली आहे.

Exit mobile version