अलिबाग, मुरूडमधील शेकडो विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप
| अलिबाग | प्रतिनिधी |
ग्रामीण भागातील गरीब, गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणाचा मार्ग सूकर व्हावा, त्यांना शिक्षणाची दारे कायम खुली राहवी, यासाठी लाईट ऑफ लाईफ या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम राबविले जातात. त्याचाच एक भाग म्हणून अलिबाग व मुरूडमधील शेकडो विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले आहे. लाईट ऑफ लाईफ या संस्थेचा विद्यार्थ्यांना आधार मिळाला आहे.
लाईट ऑफ लाइफ ट्रस्ट ही सामाजिक संस्था 2005 पासून सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहे. सध्या संस्था भारतातील अनेक राज्यात ग्रामीण विभागातील विद्यार्थाना शिक्षणाच्या माध्यमातून प्रोत्साहन देण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करत आहे. तळागाळातील गरीब-गरजू होतकरू मुले शाळेमध्ये गेली पाहिजेत, ती मुले शाळेत टिकली पाहिजे हा उद्देश समोर ठेवून ट्रस्टच्या माध्यमातून कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. गेल्या 19 वर्षापासून अनेक शाळांना भेटी देऊन तेथील गरजू व गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आधार देण्याचा काम संस्था करीत आहेत. लाईट ऑफ लाइफ ट्रस्ट या सामाजिक संस्थेच्या अंतर्गत बोर्ली, वळके, रामराज आणि बेलोशी या चार विभागातील शाळेमधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम शनिवार व रविवारी घेण्यात आला. आठवी ते 12 वीच्या 455 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वितरीत करण्यात आले. या कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्ते, विद्यार्थी व पालक मिळून 950 हून अधिक जण उपस्थित होते. शनिवारी (दि. 21) रामराज व बेलोशी तसेच रविवारी (दि. 22) बोर्ली व वळके केंद्रामध्ये हा उपक्रम राबविण्यात आला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आर्या राऊत , अनुजा राउळ, रश्मी अष्टमकर, राणी जाधव, अपेक्षा शेळके आणि सोनल घरत तसेच इतर शिक्षकांचा उल्लेखनीय सहभाग होता.







