। मुंबई । प्रतिनिधी ।
सध्या उत्तर भरतात पश्चिमी वार्याचा विक्षोभ सुरू आहे. त्यामुळे अरबी समुद्रात मोठ्या प्रमाणात आर्द्रता निर्माण होत आहे. पुढील 3 ते 4 दिवस हीच स्थिती कायम राहणार आहे. 10 ते 13 जानेवारी दरम्यान वायव्य आणि मध्य भारतात हलका ते मध्यम पाऊस कोसळणार आहे. तर आजपासून पुढील तीन दिवस मराठवाड्यासह विदर्भात विजांच्या कडकडाटासह, वादळी वारा आणि गारपीट होण्याची शक्यता आहे.
उत्तर भारतात सध्या थंडीची तीव्र लाट आली असून अनेक ठिकाणी हिमवृष्टी होत आहे. याचा एकंदरीत परिणाम म्हणून मुंबईसह राज्यातील हवामानात झपाट्याने बदल होत आहे. मागील चोवीस तासांत राज्यात अनेक ठिकाणी तापमानाचा पारा घसरला आहे. तर पुढील चार दिवस राज्यात मराठवाड्यासह विदर्भात विजांच्या कडकडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हवामान खात्याने आज परभणी, हिंगोली, नांदेड, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या नऊ जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला आहे. पुढील काही तासांत याठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे. संबंधित जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी गारपिटीचा इशारा देखील हवामान खात्याने दिला आहे. याशिवाय आज औरंगाबाद, बीड, जालना, लातूर आणि उस्मानाबाद या जिल्ह्यात देखील तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. आज सकाळपासूनच याठिकाणी ढगाळ हवामानाची नोंद करण्यात आली आहे.
पुढील आणखी तीन दिवस राज्यात हवामानाची हीच स्थिती कायम राहणार आहे. शुक्रवारनंतर पुन्हा पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने उद्या वर्धा, यवतमाळ, नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया या सात जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला आहे.