| श्रीवर्धन | वार्ताहर |
श्रीवर्धन तालुक्यामध्ये महावितरणच्या विजेचा खेळखंडोबा नियमित सुरू आहे. कोणत्याही प्रकारचा वादळ, वारा, पाऊस नसतानासुद्धा अनेक वेळा वीज दोन ते चार तासांपर्यंत गायब असते. विशेष करून सायंकाळी सात ते रात्री अकरा या वेळामध्ये वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार नियमित घडत असतात. काल सायंकाळी सात वाजता खंडित झालेला वीजपुरवठा सुरळीत होण्यासाठी रात्रीचे दोन वाजले.
याबाबत महावितरणच्या अभियंत्यांना दूरध्वनीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, या अभियंत्यांकडून फोन न उचलण्याचे प्रकार घडतात. परतीचा पाऊस सुरू असल्यामुळे सायंकाळच्या वेळेस विजा चमकतात व गडगडाट देखील होतो. अशा वेळेला अर्धा ते पाऊण तास वीजपुरवठा खंडित राहणे अपेक्षित आहे. परंतु, इतर वेळेला कोणतेही कारण नसताना वीजपुरवठा खंडित होतो. याबाबत महावितरणचे वरिष्ठ अधिकारीदेखील उत्तर देत नाहीत. काल रात्री दोन वाजता सुरुवात झालेला वीजपुरवठा आज सकाळी आठ वाजल्यापासून पुन्हा खंडित झालेला आहे. याबाबत चौकशी केली असता कांदळगाव या ठिकाणाहून वीजपुरवठा खंडित झाल्याचे सांगण्यात आले.
गेल्या अनेक महिन्यांपासून श्रीवर्धन येथील उपकार्यकारी अभियंता हे महावितरणच्या कार्यालयातील पद रिक्त असून, महावितरणच्या वरिष्ठ कार्यालयाकडून सदरचे पद भरण्यात येत नसल्यामुळे श्रीवर्धनमधील ग्राहकांना वारंवार वीज पुरवठा खंडित होण्याच्या कारणाला सामोरे जावे लागत आहे. तरी महावितरणने आपल्या कारभारात सुधारणा न केल्यास श्रीवर्धन महावितरण कार्यालयावर श्रीवर्धनमधील सर्वपक्षीय नागरिकांचा मोर्चा काढण्यात येणार असा इशारा देण्यात आला आहे.