मुसळधार पावसाने रिसॉर्ट, वीटभट्ट्या, लग्नमंडपांना भिजवले
। रेवदंडा । प्रतिनिधी ।
आज सकाळपासून रेवदंडा आणि आजूबाजूच्या परिसरात प्रचंड विजांचा कडकडाट आणि मुसळधार पावसाच्या जोरदार सरी कोसळत होत्या. अचानक आलेल्या या पावसाने नागरिकांची धावपळ उडाली. याचवेळी बागमळ्याजवळील पेट्रोल पंपाच्या पाठीमागे असलेल्या उंच ताडाच्या झाडावर वीज कोसळली. वीज पडताच झाडाने क्षणार्धात पेट घेतला आणि आकाशात ठिणग्यांचा वर्षाव होत असल्याचे थरारक दृश्य उमटले. मुसळधार पावसातही झाडाची आग काही काळ धगधगत राहिल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले.
घटनास्थळाजवळच CNG पेट्रोल पंप असल्याने संभाव्य धोका लक्षात घेता घबराटीचे वातावरण निर्माण झाले. सुदैवाने कोणतीही मोठी दुर्घटना घडली नाही. मात्र, या घटनेने स्थानिक नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली असा स्थानिकांचा सांगण्याचा भाग आहे.
पावसाने रिसॉर्ट, वीटभट्ट्या, लग्नमंडपांचे नुकसान
अचानक पावसामुळे रेवदंडा आणि परिसरातील अनेक रिसॉर्टमध्ये लाईटिंग केलेल्या विद्युत सजावटी खराब झाल्या. पावसाचे पाणी जाऊन यंत्रणांना नुकसान झाले, तर रिसॉर्ट मालकांना मोठा फटका बसला. काही ठिकाणी घरांच्या छप्परांचे कामे सुरू असताना पावसाने वस्तू भिजवल्या आणि नुकसानकारक झाल्या. विशेषत: वीटभट्टीवाल्यांना अतोनात नुकसान झाले. भट्ट्यांमधील लाकड, विटा भिजल्याने व्यवसाय ठप्प झाला आहे.
काही ठिकाणी लग्नाचे मंडप भिजले, पाहुण्यांची तारांबळ उडाली. मात्र, या सरींमुळे वातावरण तात्पुरते थंडगार झाले आहे. स्थानिक प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून, पुढील हवामान अहवालावर लक्ष ठेवण्याचे आवाहन केले आहे.
