। पनवेल । प्रतिनिधी ।
पनवेल तालुक्यातील चिपळे जवळील भोकरपाडा येथील इमारत आणि शाळेतील घरावर वीज पडल्याने घरातील पत्रे, भिंत, लोखंडी पाईप, यांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. 20 जूनपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. विजांचा कडकडाट देखील सुरू आहे. पनवेल तालुक्यातील भोकरपाडा येथील एका इमारत आणि साई होम चाळीवर दुपारी बारा- साडेबाराच्या दरम्यान वीज कोसळली. यात चाळीतील घराचे पत्रे, भिंत, लोखंडी पाईप, फॅन आणि सिलिंगचे नुकसान झाले आहे. अमित लबाडे यांच्या पत्नी या त्यांच्या मुलाला बाथरूमला घेऊन गेल्या होत्या. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. अन्यथा मोठा अपघात झाला असता. या घटनेची माहिती भोकरपाडा येथील हनुमान फुलोरे, रुपेश फुलोरे, गणेश फुलोरे यांच्याकडून पनवेल तहसील कार्यालयाला देण्यात आली. त्यानंतर चिपळे तलाठी यांनी पंचनामा केला आहे.