| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
अपूऱ्या साठ्यामुळे साखर साठवणुकीवर मर्यादा ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता दुकानांमधून अपेक्षीत साखर मिळणे कठीण होणार आहे. ऐन सणासुदीत साखरेवर निर्बंध लावल्याने ग्राहकांमध्ये नाराजीचे सुर उमटू लागले आहेत.
साखर हा सर्वसामान्यांच्या जीवनातील अविभाज्य भाग आहे. चहा बनविण्यासाठी साखरेचा वापर केला जातो. तसेच वेगवेगळ्या दुकानांमध्ये मिठाई बनविण्यासाठी दुधासह साखरेचीही मागणी अधिक असते. मात्र, हवामान बदलामुळे ऊस पिकाचे नुकसान तसेच उत्पादनात घट झाल्याने साखरेचे दर वाढविल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे 44 ते 48 रुपये किलोने मिळणारी साखर 68 ते 72 रुपये किलोने बाजारात मिळत आहे. साखरेचा तुटवडा निर्माण झाल्याने नियमीत साखरेचा वापर करणारे मोठ्या संकटात सापडले आहेत. सरकारने साखरेच्या साठवणूकीवर निर्बंध लागू केले आहेत. फक्त शंभर क्विंटल साखर साठविण्याची मर्यादा दिली आहे.त्यामुळे खालापूर, कर्जत, पनवेल या भागातील साखर विक्रेते मोठ्या आर्थिक अडचणीत सापडले आहे. आगामी दहीहंडीसह गणेशोत्सवामध्ये साखर खरेदी करताना ग्राहकांवर निर्बंध राहणार आहेत. त्याची सुरुवात जिल्ह्यातील वेगवेगळ्या दुकानांमध्ये सुरु झाली आहे. ग्राहकांना अपेक्षित साखर मिळत नसल्याने तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. मिठाई तयार करण्यासाठी साखरेचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. परंतु, साखरेच्या साठवणूकीवर निर्बंध आल्याने साखर खरेदी करतानाही व्यापाऱ्यांना अडचण निर्माण झाली असल्याचे काही ग्राहकांकडून सांगण्यात आले आहे. साखरेचा काळा बाजार करणाऱ्यांवर पुरवठा विभागाची नजर राहणार आहे. पथकामार्फत वेगवेगळ्या साखर विक्रेत्यांची तपासणी केली जाणार असल्याची माहिती पुरवठा विभागाकडून देण्यात आली आहे.
साखरेच्या दरात अचानक वाढ झाल्याने नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. मात्र, साखरेचा मुबलक साठा उपलब्ध आहे. जास्त वेळ साठवून ठेवण्यासारखी ही वस्तू नाही. मागणीनुसार साखर ग्राहकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न आहे. शंभर क्विंटल साठवणुकीच्या मर्यादेचा रायगड जिल्ह्यावर फारसा परिणाम होणार नाही.
राजेंद्र प्यारेलाल
व्यापारी
