पोलीस निरीक्षक सचिन पवार यांचे आवाहन
| रसायनी | प्रतिनिधी |
सोशल मीडियाचे अनेक वाईट परिणाम आहेत. मानसिक आरोग्यावर ताण, व्यसन, अभ्यासात लक्ष न लागणे, झोप कमी होणे आणि सायबर बुलिंग यामुळे वास्तविक जीवनातील संबंधांवरही नकारात्मक परिणाम होतो. गोपनीयतेचा धोका वाढून वाईट प्रसंगाला सामोरे जावे लागते. त्याने एखाद्याचे आयुष बरबाद होते, असे संबोधन खालापूर वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन पवार यांनी केले. जिल्हा परिषद व पंचायत समिती यांच्या निवडणूका लागल्या असल्याने खालापूर पोलीस निरीक्षक सचिन पवार यांनी ग्रुप ॲडमिन, वॉट्स ॲप ग्रुप, इंस्टाग्राम, फेसबुक ॲडमिन व गाव पोलीस पाटील यांची बैठक आयोजित केली होती. त्याप्रसंगी ते उदाहरण देऊन मार्गदर्शन करीत होते.
यावेळी ते म्हणाले की, मानसिक आणि भावनिक परिणाम, ऑनलाइन जास्त वेळ घालवल्याने प्रत्यक्ष सामाजिक संबंध कमी होतात आणि एकाकीपणाची भावना निर्माण होते. ऑनलाइन नकारात्मक टिप्पण्या किंवा लाइक्स न मिळाल्यास आत्मसन्मान कमी होऊ शकतो. यामुळे आपले वर्तन आणि जीवनशैलीतील बदल होतो. सोशल मीडियावर जास्त गुंतल्याने वास्तविक जबाबदाऱ्यांकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे सुरक्षा आणि सामाजिक धोके निर्माण होतात. चुकीची किंवा भडकाऊ माहिती पसरते. ज्यामुळे समाजात गैरसमज निर्माण होतात. यासाठी सोशल मीडियाचा वापर मर्यादित ठेवा, असे आवाहन करण्यात आले.
तसेच, खऱ्या आयुष्यातील लोकांशी प्रत्यक्ष भेटा, पोस्ट करण्यापूर्वी विचार करा आणि माहितीची सत्यता तपासा. सकारात्मक आणि योग्य गोष्टींसाठी सोशल मीडियाचा वापर करा, असे सांगून आंतरराष्ट्रीय स्तरावर घडलेल्या घटनांचा आढावा घेऊन सोशल मीडिया चांगल्या पद्धतीने वापरा, असे आवाहन उप विभागीय पोलीस अधिकारी डॉ. विशाल नेहुल यांनी केले.






