| पाली/बेणसे | प्रतिनिधी |
पाली-खोपोली महामार्गावर आंबोले गावापासून ते थेट खुरवले पेट्रोल पंपाच्या पुढपर्यंत रस्त्यावर हजारो रिकाम्या दारू आणि बिअरच्या बाटल्या पडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. महामार्गावर मोठ्या प्रमाणावर या बाटल्या फुटल्या असून, रस्त्याभर काचांचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे या मार्गावरून जाणाऱ्या अनेक वाहनांच्या टायरमध्ये काचा घुसून टायर पंक्चर झाले असून, अपघाताचा अत्यंत गंभीर धोका निर्माण झाला आहे. ही घटना सोमवारी (दि.1) रात्रीच्या सुमारास घडली असावी. भंगार किंवा रिकाम्या बाटल्या वाहून नेणाऱ्या एखाद्या ओव्हरलोड ट्रक अथवा मालवाहू गाड्यातून या बाटल्या रस्त्यावर कोसळल्या असण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. ट्रकचालकाच्या निष्काळजीपणामुळे हा प्रकार घडला असून, बाटल्या पडल्यानंतर संबंधित वाहन चालक तिथून पसार झाला असावा असे प्रवासी राहुल महाजन यांनी सांगितले.







