दारूचा साठा आणि टेम्पो जप्त

। पालघर । प्रतिनिधी ।

विधानसभा निवडणूकीच्या अनुषंगाने केंद्र शासित प्रदेशातून पालघर जिल्ह्यात होणार्‍या मद्य तस्करीवर आळा घालण्यासाठी सीमा भागात दिवसरात्र गस्त आणि करडी नजर ठेवली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार उधवा- तलासरी रस्त्यावर दमण बनवटीच्या दारूची तस्करी होणार असल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकार्‍यांनी शुक्रवारी पहाटे उधवा तलासरी रस्त्यावर सापळा रचला होता. यावेळी संशयीत पिकअप टेम्पो थांबवून टेम्पोची तपासणी केली असता टेम्पोमध्ये विशेष पॅकिंग करुन पुट्ट्ठांच्या खोक्यात लपवून ठेवलेला दमन बनावटीचा दारूचा साठा आढळून आला. तपासणीत आढळलेला 80 बॉक्स दारूचा साठा आणि टेम्पो जप्त करण्यात आला आहे. टेम्पो चालकाला अटक करून त्याच्या विरोधात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई उत्पादन शुल्क विभागाच्या डहाणू विभागाचे निरीक्षक शसुनिल देशमुख, भरारी पथकाचे निरीक्षक ए.एस. चव्हाण, दुय्यम निरीक्षक, राजेश एस. शिंदे, विश्‍वजीत आभाळे, विकास आबनावे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक ए.एम.शेख, जवान कमलेश पेंदाम, अमोल नलावडे आणि शशिकांत पाटील यांच्या पथकाने कारवाई केली.

Exit mobile version