लाखो रुपयांचा दारूचा मुददेमाल नष्ट

पनवेल शहर पोलिसांची कारवाई

। पनवेल । वार्ताहर ।

पनवेल शहर पोलीस ठाणेकडील सन 2008 ते 2023 या कालावधीमधील विविध दाखल 38 गुन्ह्यांमधील दारूच्या बॉटल, कॅन व अन्य जप्त करण्यात आलेला मुददेमाल न्यायालयाच्या आदेशाने करंजाडे येथे नष्ट करण्यात आला आहे.

पनवेल शहर पोलिसांनी विविध दारूबंदी गुन्ह्यांमध्ये दारूच्या बॉटल, कॅन व अन्य मुददेमाल जप्त केला होता. या गुन्ह्यांचा तपास पूर्ण होवून आरोपीविरूध्द न्यायालयामध्ये दोषारोपपत्र सादर करण्यात आले. जप्त मुद्देमाल मोठ्या प्रमाणात असल्याने पोलीस ठाणे मुद्देमाल कक्षामध्ये ठेवण्यास जागा अपुरी पडत होती. या गुन्ह्यातील जप्त मुद्देमाल पोलीस ठाणे येथे दिर्घ कालावधी पासून पडून असल्याने बदलत्या हवामानाचा परिणाम होवून नाश होत होता. दारूचे कॅन उंदीर कुरतडून नष्ट करीत होते. यामुळे बदलत्या हवामानात परिणाम होवून उग्र वास येत होता. त्याचा परिणाम पोलीस ठाण्याकडील पोलीस अधिकारी, अंमलदार, तसेच पोलीस ठाणे येथे कामकाजाकरिता येणारे नागरिक यांच्या आरोग्यावर होत होता. याकरिता पोलीस ठाण्यातील साठयाची विल्हेवाट लावणे आवश्यक असल्याने प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, पनवेल यांच्याकडून 38 गुन्ह्यांमधील दारूचा मुद्देमाल नाश करण्याबाबत आदेश प्राप्त करण्यात आले होते.

त्याप्रमाणे विशेष पथकाने पनवेल शहर पोलीस ठाण्याकडील एकुण 38 गुन्ह्यांमधील 90 मिलीच्या 767 बाटल्या, 1980 मिलीच्या 1942 बाटल्या , 750 मिलीच्या 1585 बाटल्या, 600 मिलीच्या 89 बाटल्या, अशा एकूण 4375 बाटल्या असा साडेसात लाखांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला. पोनि. फणसेकर, राज्य उत्पादन अधिकारी पनवेल शहर, वाय एस लोळे, दुय्यम निरीक्षक उत्पादन शुल्क, पनवेल शहर एस ए जाधव, दुय्यम निरीक्षक उत्पादन शुल्क, पनवेल शहर, तसेच पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे, पोलीस निरीक्षक प्रशासन भगत, सपोनि राजपुत, सपोनि शेटे पोलीस ठाण्याचा इतर स्टाफ याचे उपस्थितीत करंजाडे सेक्टर -5 या सुरक्षित ठिकाणी पर्यावरणाची कोणत्याही प्रकारची हानी न होता मुद्देमालाचा नाश करण्यात आला असल्याची माहिती नितीन ठाकरे यांनी दिली.

Exit mobile version