महिन्याभरात 38 गंभीर गुन्हे उघडकीस
| पनवेल | प्रतिनिधी |
पनवेल शहर पोलीस ठाण्याने जुलै महिन्यामध्ये एक उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यात त्यांनी 38 गंभीर गुन्हे उघडकीस आणले असून त्यातील 57 जणांना गजाआड केले आहे. पोलिसांनी उघडकीस आणलेल्या गुन्ह्यांमध्ये चोरी, जबरी चोरी, घरफोडी, फसवणूक आणि अंमली पदार्थांशी संबंधित गुन्ह्यांचा समावेश असून, पोलिसांनी त्यांच्याकडून एकूण 71 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्यामुळे पनवेल शहरातील गुन्हेगारांनी याचा धसका घेतला आहे.
दरम्यान, पनवेल येथील एका कुटुंबाला शेतातून गुप्तधन काढून देण्याच्या बहाण्याने एका भोंदूबाबाने त्यांचे 39 लाख 70 हजार रुपये किमतीचे सोने आणि रोख रकमेची फसवणूक केली होती. त्या भोंदूबाबाला पनवेल शहर पोलिसांनी कोल्हापूर जिल्ह्यातून अटक करून त्याने फसवणूक केलेले सर्व दागिने व रोख रक्कम जप्त केली आहे. दुसऱ्या गुन्ह्यात आयफोन चोरुन नेणाऱ्या चोरट्याचा पाठलाग करत ओडिशातील त्याच्या मूळगावी जाऊन अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी पुराने वेढलेल्या गावात फायर ब्रिगेडच्या मदतीने 8 किमी. पाण्यातून प्रवास करत त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून 7 लाख 24 हजार 500 रुपये किमतीचे 5 आयफोन जप्त केले. तिसऱ्या गुन्ह्यात पनवेल बस स्थानक परिसरात प्रवाशांना लिफ्ट देण्याच्या बहाण्याने लुटणाऱ्या टोळीला अटक केली आहे.
त्यांच्याकडून 2 लाख 27 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच, रेल्वे स्थानक परिसरात बॅग चोरणाऱ्या टोळीतील 5 आरोपींना अटक करण्यात आली असून 11 लाख 67 हजार रुपये किमतींचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. त्याचबरोबर दुकानांचे शटर उचकटून चोरी करणाऱ्या टोळीला देखील ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून 4 लाख 95 हजार 810 रुपये किमतीचे 45 मोबाईल जप्त केले आहेत. आणखी काही गुन्हे देखील उघडकीस आले आहेत.
या साऱ्या कारवाया नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, सहआयुक्त संजय येनपुरे, परिमंडळ 3 चे पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते आणि पनवेल विभागाचे सहाय्यक आयुक्त भाऊसाहेब ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक नितीन ठाकरे, पोलीस निरिक्षक (गुन्हे) शाकीर पटेल, पोलीस निरिक्षक (प्रशासन) अभिजीत अभंग यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कामगिरी यशस्वी केली आहे. त्यामुळे पनवेल शहरातील चोरट्यांचे धाबे दणाणले असून पनवेल शहर पोलिसांचे स्थानिकांकडून कौतूक होत आहे.
पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या या यशस्वी कामगिरीचे संपूर्ण श्रेय आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाला आणि पोलीस पथकाच्या अथक परिश्रमाला जाते. वरिष्ठांच्या मार्गदर्शनामुळेच आम्ही एका महिन्यात 38 गुन्हे उघडकीस आणून 57 आरोपींना अटक करत त्यांच्या ताब्यातून 71 लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करू शकलो.
नितीन ठाकरे,
वरिष्ठ पोलीस निरिक्षक, पनवेल शहर







