रायगड जिल्हा बँकेकडून महिलांना साक्षरतेचे धडे

रोहा येथे महिलांना व्यवसायाभिमुख मार्गदर्शन

| रोहा | वार्ताहर |

राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक (नाबार्ड) व दि रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने आर्थिक व डिजिटल साक्षरता कार्यक्रम व हळदीकुंकू समारंभ दमखाडी रोहा येथे पार पडला. या मेळाव्यास बँकेचे संचालक गणेश मढवी, नगरसेविका सौ. पडवळ, सौ. कोल्हटकर, रोहा शाखेचे व्यवस्थापक राजेंद्र जंगम, बँकेचे रोहा तालुका निरीक्षक वैभव पाटील, कर्मचारीवृंद तसेच दमखाडी रोहा परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

याप्रसंगी गणेश मढवी यांनी महिलांना व्यवसायाभिमुख असे मोलाचे मार्गदर्शन केले, तर शाखा व्यवस्थापक श्री. जंगम यांनी बँकेच्या कामकाजाबद्दल तसेच बँक ग्राहकांना पुरवित असलेल्या विविध योजनांबद्दल, सोने तारण कर्ज, ठेवी व बचतीचे महत्त्व सांगून बचतगटांच्या माध्यमातून महिला आर्थिकदृष्ट्या कशा सक्षम होऊ शकतात याचे महत्त्व पटवून दिले, तसेच डिजिटल साक्षरतेबाबत माहिती सांगितली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैभव पाटील यांनी, तर पूजा वावेकर यांनी उपस्थित मान्यवर व महिलांचे आभार मानले.

महिलांनी स्वावलंबी बनले पाहिजे- शाखाधिकारी पी.पी. येरुणकर

| महाड | प्रतिनिधी |


नाबार्ड दिनाच्या औचित्य साधून राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक आणि रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड अलिबाग शाखा नाते यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामीण भागातील महिला बचत गटाच्या सक्षमीकरणासाठी आर्थिक साक्षरता अभियान कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. यावेळी शाखाधिकारी पी.पी. येरूणकर यांनी जिल्हा बँकेच्या विविध योजनांची माहिती दिली. दरम्यान, बँकिंग व त्यामधील विविध प्रकारचे कर्ज योजनांची माहिती देत सध्याच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान युगामध्ये महिलांनी एटीएम, फोन पे, गुगल पे, क्यूआर कोड अशा आधुनिक तंत्रज्ञानात वापर करत स्वावलंबी होण्यासाठी मुख्य प्रवाहात राहणे गरजेचे असल्याचे सांगून बचत गटांना जिल्हा बँकेमार्फत विविध प्रकारच्या कर्जांचा पुरवठा केला जाईल, असे सांगितले.

दरम्यान, महाड पंचायत समितीच्या प्रभाग समन्वयक योगिता जैतपाळ यांनी प्रधानमंत्री योजना विमा योजना, पेन्शन योजना, सुकन्या योजना व बचत गटासाठी शासकीय योजनांची माहिती दिली. यावेळी अस्मिता देवळेकर, कीर्ती मोरे, प्रज्ञा नातेकर, सुचिता चव्हाण व बचत गटाच्या महिला व बँक कर्मचारी उपस्थित होते.

Exit mobile version