लहानग्या सईचा ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’

हुलाहुपमध्ये 18 मिनिटांत 521 गिरक्या

। माणगाव । प्रतिनिधी ।

माणगाव तालुक्यातील विद्यार्थी आणि खेळाडू आता आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत आपल्या खेळाचा आणि बुद्धिमत्तेचा ठसा उमटवित आहेत. आपली किर्ती सातासमुद्रापार पोहचावी यासाठी कसून मेहनत घेत आहेत. अशाच एका माणगाव येथील भादाव गावातील सई सतिश तळकर या 7 वर्षाच्या लहानगीने हुलाहुपमध्ये नव्या विक्रमाची नोंद केली आहे. सईने स्वतःला गिरकी घेत स्वतः भोवती अँटिक्लॉक प्रमाणे रिंग फिरवण्याच्या प्रकारात ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’ यामध्ये आपले नाव कोरले आहे. तीने 18 मिनिटे 9 सेकंदात हुलाहुप करीत 521 गिरक्या घेऊन भारतीय विक्रम प्रस्थापित केला आहे.

सई तळकर ही माणगाव शहरातील भादाव या छोट्याशा खेड्यात राहत असून ती रायगड जिल्हा परिषद शाळेत इयत्ता दुसरीत शिक्षण घेत आहे. तिचा लहान भाऊ स्वस्तिक याने भाऊबीज म्हणून हुलाहुप करण्यासाठी एक गोल रबरी रिंग आणून दिली होती. यावर ती दररोज नित्य नियमाने सराव करीत होती. यानंतर तीने 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी रोजी शाळेत आपली कला सादर केली होती. यावेळी गावातील लोकांचा चांगल्याप्रकारे प्रतिसाद मिळाल्याने सई आणि तिच्या आई-वडीलांचा उत्साह वाढला होता.

यादरम्यान, या कलाआविष्काराची सईला गोडी लागली आणि ती अतिशय वेगाने कमरेभोवती रिंगची गोल फिरकी घेत असल्याचे आईवडिलांच्या लक्षात आले. यानंतर तीच्या आईने मोबाईलवरून हा नृत्यप्रकार शोधून ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’ यांच्याशी संपर्क साधला होता. तिच्या या गिरकी नृत्याचा व्हिडिओ संस्थेला पाठविला. यानंतर संस्थेने खातरजमा केल्यानंतर तीन महिन्याने सई हिने हुलाहुपमध्ये सर्वोच्च आणि सर्वोत्तम कामगिरी करून राष्ट्रीय विक्रम नोंदविला आहे, असे कळविण्यात आले. यावेळी संस्थेने सन्मानित केलेल्या सन्मान पत्रात ‘सई हि घड्याळाच्या काट्याप्रमाणे वेगाने फिरते’ अशा शब्दात गौरव केला आहे.

यावेळी लहानग्या सईला सुवर्णपदक, सन्मान प्राप्त पत्र आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड 2024 च्या भारतीय विक्रमांचे पुस्तक देऊन 19 नोव्हेंबर रोजी सन्मानित करण्यात आले आहे. सईने माणगावसह रायगड जिल्हा व महाराष्ट्राचे नाव देशात उंचावले आहे. याबद्दल माणगावचे उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते विजय मेथा, माजी नगराध्यक्ष आनंद यादव, माजी उपनगराध्यक्ष राजेश मेहता व अरुण पवार यांनी सई तळकरचे कौतुक करीत तिला शुभेच्छा दिल्या आहेत. आता सईचे लक्ष लिम्का आणि गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डकडे लागून राहिले आहे.

Exit mobile version