अपघाताचा धोका वाढला, प्रशासनाचे दुर्लक्ष
| गोवे-कोलाड | वार्ताहर |
मुंबई-गोवा महामार्ग 66 वरील आंबेवाडी नाक्यावर बेवारस मोकाट गुरे रस्त्यावर गोठा समजून दररोज बस्थान मांडून बसत आहेत. यामुळे प्रवाशांच्या जिवाला धोका निर्माण झाला असून, याकडे प्रशासनाने लक्ष देऊन उपाययोजना करावी, अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे.
रोहा तालुक्यातील मोठ्या प्रमाणात शेतजमीन मुंबई व इतर शहरातील धनिकांना विकल्या असून, त्यांनी शेतीभोवती तारेचे कुंपण केले आहे. यामुळे गुरे चारण्यासाठी जागा उरलेली नाही. त्यामुळे शेती विकणार्या शेतकर्यांनी बिनकामी गुरे मोकाट सोडलेली आहेत. ही गुरे रस्त्यावर बस्तान मांडून बसत आहेत. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी निर्माण होऊन अपघात होताना दिसत आहे. यामुळे अशा मोकाट गुरांचा बंदोबस्त संबंधितांकडून केला जावा, अशी मागणी प्रवासी करीत आहेत.