कोशिंबळे धबधब्याच्या डोहात बुडून स्थानिकाचा मृत्यू

| पाली / बेणसे | प्रतिनिधी।

सुधागड तालुक्यातील कोशिंबळे व नागशेत गावांच्या हद्दीत असलेल्या धबधब्याच्या खोल डोहात बुडून 48 वर्षीय स्थानिक नागरिकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सोमवारी (दि. 20) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली. मिलिंद मारुती दिघे असे मृत व्यक्तीचे नाव आहे. रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास धबधब्याच्या पुढील भागात त्यांचा मृतदेह शोधण्यात रेस्क्यू पथकाला यश आले.

आपदा मित्र अमित निंबाळकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, मिलिंद दिघे हे काही मित्रांसोबत कोशिंबळे येथील धबधब्यावर भिजण्यासाठी गेले होते. मात्र, पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने ते धबधब्याच्या खोल डोहात बुडाले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक आपदा मित्र तसेच शेलार मामा रेस्क्यू टीमचे सदस्य तातडीने घटनास्थळी दाखल झाले. यावेळी घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. रेस्क्यू टीमच्या जवानांनी जीवाची पर्वा न करता रात्रीच्या अंधारात धबधब्याच्या पाण्याच्या प्रवाहात उतरून शोधकार्य सुरू केले. मात्र, डोंगराळ भागातील दाट अंधार, मुसळधार पाऊस आणि वाढता पाण्याचा प्रवाह यामुळे शोधकार्यात मोठे अडथळे निर्माण झाले. अखेर पाण्याच्या प्रवाहासोबत काही अंतर वाहून गेलेला मिलिंद दिघे यांचा मृतदेह शोधण्यात रेस्क्यू पथकाला यश आले.

Exit mobile version