धबधब्याच्या डोहात बूडून मुंबईतील तरुणाचा मृत्यू
। पनवेल । प्रतिनिधी ।
पनवेल तालुक्यातील वाजे येथील कुंडी धबधब्यावर मित्रांसह वर्षा सहलीचा आनंद घेण्यासाठी आलेल्या एका मुंबईतील तरुणाचा धबधब्याच्या खोल डोहात बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी घडली आहे. अभिनेता सलमान खान याच्या फार्म हाऊसजवळच हा धबधबा आहे.
पनवेल तालुका पोलीस ठाणे हद्दीत कुंडी धबधबा येथे मुंबई येथील शिवडी परिसरातील 6 मित्र फिरण्यासाठी आले असता सकाळी 9 वाजेच्या सुमारास मौसिन मुघल ( वय 19 वर्षे ) व त्याचा मित्र सिद्धेश संजय माने (वय 19 वर्ष) हे दोघे पाय घसरून पाण्यात पडले. यातील सिद्धेश हा एका मुलाचा पाय पकडून वर आला परंतु, मौसिन हा कुंडी धबधब्याच्या खोल डोहात बुडाला.
स्थानिक रहिवासी व अग्निशमन दलाचे जवान यांच्या मदतीने मौसिन याला बाहेर काढून पनवेल जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले असता तेथे त्याला मृत घोषित करण्यात आले. मौसिन याचे वडील परदेशात कामाला असून तो एकुलता एक मुलगा होता. कॉलेजसंबंधी कामानिमित्त बाहेर जात असल्याचे सांगून तो घराबाहेर पडला होता.