शिंदे गट-भाजपा वाद विकोपाला
। रायगड । खास प्रतिनिधी
विविध कार्यक्रमांतून रायगड लोकसभेवर भाजपाने हक्क सांगण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) विद्यमान खासदार सुनील तटकरे यांची गोची झाली आहे. रायगडातून तटकरे कंपनीला हटवण्यासाठी शिंदे गटाच्या स्थानिक आमदाराने काही वर्षांपूर्वी उपसलेली तलवार म्यान केली आहे. त्यांनी चक्क खासदार तटकरे यांना समर्थन देणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे आगामी काळात भाजपा आणि शिंदे गटातील वाद विकोपाला जाण्याची शक्यता नाकारता येणार नाही. तटकरे आणि स्थानिक आमदाराने आपापल्या तलवारी कितीही पाजवल्या असल्या तरी त्यांची धार जनता बोथट करणार असल्याचे बोलले जाते.
लोकसभा निवडणुका कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता आहे. एप्रिल महिन्यात निवडणुका होणार असल्याचे बोलले जाते. त्यानुसार भाजपाने आपली तयारी सुरु केली आहे. ‘अबकी बार चारसो पार’ असा नारा भाजपाने दिला आहे. त्यामुळे भाजपाला प्रत्येक मतदार संघातील सीट महत्त्वाची आहे. रायगड लोकसभेवर काँग्रेसचे वर्चस्व होते. कालांतराने त्यामध्ये बदल होत गेला. गेल्या तीन दशकांपर्यंत येथे शिवसेनेचे धनुष्यबाण चालायचे. 2014 च्या निवडणुकीत तटकरे यांचा पराभव शिवसेनेच्या अनंत गीते यांनी केला होता. शेकापच्या मदतीने तटकरे यांनी गीते यांचा विजयाचा वारु 2019 च्या निवडणुकीत रोखला होता. आता मात्र पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची शकलं झाली आहेत. भाजपाचे देवेंद्र फडणवीस हे यासाठी कारणीभूत असल्याचा आरोप विरोधक सातत्याने करतात. आता तर रायगड लोकसभेवर त्यांनी थेट हक्क सांगण्यास सुरुवात केली आहे.
तटकरे यांच्यासारख्या अन्य नेत्यांच्या भ्रष्टाचाराच्या फायली खोलू नये यासाठी अजित पवार यांनी भाजपासोबत हातमिळवणी केल्याचे विरोधक जाहीर सभेत बोलतात. त्यामुळे भाजपा बोलेल तेच त्यांना करावे लागणार असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. भाजपा तटकरेंना डावलून येथे भाजपा उमेदवार देणार आहे. भरसभांमध्ये शड्डू ठोकून ते येथील सीट कशी निवडून येईल हे सांगत आहेत. ही बाब विद्यमान खासदांरासाठी अत्यंत लाजीरवाणी आहे. भाजपाने तटकरे यांच्यावर निशाणा साधायला सुरुवात केल्याने त्यांच्या मदतीसाठी शिंदे गटाचे स्थानिक आमदार धावले आहेत. मात्र, याच आमदारांनी तटकरे आणि कंपनी विरोधात रान पेटवले होते. दरम्यान, आता या आमदारांना तटकरेंबद्दल असा कोणता साक्षात्कार झाला की ते तटकरे यांचे गोडवे गायला लागले आहेत. लोकसभेला तटकरेंना मदत करुन त्या बदल्यात आमदरकीसाठी तटकरेंची मदत घ्यायची, असे स्वप्न कदाचित आमदारांना पडले असावे. परंतु, याच तटकरेंनी विद्यमान आमदारांचा 2015 साली जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत काटा काढला होता आणि कर्जतचे सुरेश टोकरे यांना या पदावर विराजमान केले होते.
राजकारणात काहीही होऊ शकते हे जरी खरे असले, तरी विद्यमान खासदार आणि आमदार यांच्या कारभाराला जनता चांगली कंटाळली आहे. त्यामुळे नजीकच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत जनता त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नसल्याचे शिवसेना (ठाकरे गट) माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी आधीच जाहीर केले आहे.
सध्या राज्यात भाजपा, शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांची सत्ता आहे. भाजपाने सभांमधून जाहीर केलेल्या उमेदवाराविरोधात भूमिका घेतल्याने स्थानिक आमदारावर कारवाईचा बडगा उगारला जाण्याची शक्यता आहे.