| पनवेल | प्रतिनिधी |
नवी मुंबई विमानतळावरुन 25 डिसेंबर, उद्यापासून विमानसेवेला सुरुवात होत आहे. परंतु, अद्यापही विमानतळाला दि.बा. पाटील यांचे नाव देण्यात आलेले नाही. यामुळे भूमीपुत्रांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. त्यामुळे उद्यापासून सुरु होणाऱ्या या विमानसेवेच्या निषेधार्थ भूमिपुत्रांनी आपापल्या गावात एकत्र येऊन गावाच्या प्रवेशद्वार, गावदेवीचे मंदिर, चावडी किंवा कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी शांततेच्या मार्गाने काळा झेंडा दाखवून निषेध नोंदवण्याचे आवाहन खा. सुरेश म्हात्रे यांनी केले आहे.
नवी मुंबई आंतरराष्टीय विमानतळाच्या नामकरणावरुन अनेक वाद, आंदोलने, मोर्चा झाले. या विमानतळाला लोकनेते दि.बा. पाटील यांचे नाव मिळावे, यासाठी भूमिपूत्र सुरुवातीपासून आग्रही आहेत. तसेच काही राजकीय नेते देखील या नावासाठी आग्रही आहेत. परंतु, विमानतळाच्या नामकरणाचा निर्णय प्रलंबित असतानाही 25 डिसेंबर, उद्यापासून या विमानतळावरुन व्यावसायिक विमानसेवा नियमित सुरु केली जात आहे. यामुळे भूमिपुत्रांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटील यांचे नाव मिळावे, यासाठी खा. सुरेश (बाळ्या) म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली भूमिपुत्रांनी 22 डिसेंबर रोजी मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला होता. या मोर्चा विषयी तसेच भूमिपुत्रांच्या अनेक प्रश्नांसाठी सुरेश (बाळ्या) म्हात्रे यांनी मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली होती. या भेटीत मनोज जरांगे पाटील यांनी भूमिपुत्रांच्या मोर्चाला ठाम पाठिंबा जाहीर केला. परंतु, निवडणूक/आचारसंहितेमुळे हा मोर्चा तात्पुरता स्थगित करण्यात आला.
उद्यापासून व्यावसायिक विमानसेवा नियमित सुरू होत आहे. परंतु, अजूनही विमानतळाला दि.बा. पाटील यांचे नाव देण्यात आलेले नाही. जोपर्यंत दि.बा. पाटील यांचे नाव विमानतळाला दिले जात नाही, तोपर्यंत हा संघर्ष कुठल्याही परिस्थितीत थांबणार नाही, अशी ठाम भूमिका खा. सुरेश म्हात्रे यांनी घेतली आहे. त्यांनी भूमिपुत्रांना आवाहन केले आहे की, 25 डिसेंबर रोजी आपापल्या गावात एकत्रित येत गावाच्या प्रवेशद्वार, गावदेवीचे मंदिर, चावडी किंवा कोणतेही सार्वजनिक ठिकाणी शांततेच्या मार्गाने काळा झेंडा दाखवत सुरु होणाऱ्या विमानसेवेला निषेध नोंदवावा. हा निषेध घराघरात कुटूंबासह केला तरी चालेल. या निषेधाचे व्हिडीओ तयार करुन व्हॉटसॲप, फेसबुक आणि इन्स्टाग्राम वर शेअर करावेत. जेणेकरुन प्रत्येक गावातून उठलेला आवाज सरकारपर्यंत पोहोचेल. समाजमाध्यमावरचा हा एकत्रित निषेध शासनाला उत्तर देण्यास भाग पाडेल.
नवी मुंबई विमानतळालगत असलेल्या चिंचपाडा गावातील ग्रामस्थ 25 डिसेंबर रोजी प्रत्यक्ष निदर्शने करणार आहेत. ज्यांना शक्य असेल त्यांनी त्या ठिकाणी पोहोचून आंदोलनात सहभाग घ्यावा आणि आपला ठाम निषेध नोंदवावा, असे आवाहन खासदार सुरेश म्हात्रे यांनी केले आहे. 25 डिसेंबरचा निषेध हा केवळ एक टप्पा आहे. हे आंदोलन संपलेले नाही, तर तात्पुरते स्थगित आहे. आचारसंहिता संपताच नव्या जोमाने, नव्या ऊर्जेसह आणि अधिक व्यापक स्वरूपात हा संघर्ष पुन्हा उभा राहील, असेही ते म्हणाले.
विमानसेवेला भूमिपुत्रांनी निषेध नोंदवावा: खा. सुरेश म्हात्रे

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606