ग्रामस्थांनी दर्शवला विरोध; ग्रामपंचायतीची मात्र ना हरकत
। महाड । वार्ताहर ।
किल्ले रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या वारंगी गावाजवळ होत असलेल्या प्रकल्पाबाबत स्थानिक प्रशासन अनभिज्ञ आहे की अनभिज्ञ असल्याचे दाखवत आहे, याबाबत स्थानिक नागरिकांना शंका निर्माण झाली आहे. यामुळे या प्रकल्पाला अनेक ग्रामस्थांनी विरोध दर्शवला असला तरी ग्रामपंचायतीकडून मात्र विरोध होण्याआधीच ना हरकत दाखला देण्यात आलेला आहे.
किल्ले रायगडाच्या पायथ्याशी स्थानिक नागरिकांच्या शेकडो एकर जमिनी काळ जलविद्युत प्रकल्पामध्ये गेल्या आहेत. हा प्रकल्प आजही धुळखात पडून आहे. प्रकल्प पूर्ण न झाल्यामुळे येथील ग्रामस्थांचे पुनर्वसन देखील झालेले नाही. जमिनींचे संपादन झालेले असले तरी आजही स्थानिक ग्रामस्थ छत्री निजामपूर, वारंगी, वाघेरी या गावातच राहत आहेत. हा प्रकल्प पूर्ण झालेला नसतानाच आणखी एका प्रकल्पाची माहिती स्थानिक ग्रामस्थांना मिळाली आहे. वारंगी गावच्या बाजूच्या जमिनीतील खडकाचे नमुने घेण्याचे काम सुरू झाले आहे. या ठिकाणी हे नमुने घेण्यासाठी रस्ता तयार करण्यात आला आहे. हा रस्ता तयार करताना डोंगरावरील झाडे देखील तोडण्यात आली आहेत. याबाबत स्थानिक ग्रामस्थ राघू तांबटकर यांनी विभागीय आयुक्तांना पत्राद्वारे तक्रार दाखल केली आहे. या परिसरात नक्की कोणता प्रकल्प होत आहे, याबाबत स्थानिक ग्रामस्थांना कोणतीच कल्पना नाही. नमुने घेणार्या कंपनीच्या लोकांनीदेखील ग्रामस्थांना कोणतीच माहिती न देता काम सुरू केले आहे.
वारंगी ग्रामपंचायतीने या जागेमध्ये पीएसपी विकसित करण्याकरता ग्रामपंचायतीची कोणतीही हरकत नसल्याचा दाखला यापूर्वीच दिला गेला आहे. यामुळे ग्रामपंचायतीचे पदाधिकारी आणि कंपनी प्रशासनामध्ये नक्की काय चर्चा झाली, याबाबत ग्रामस्थांमध्ये चर्चा निर्माण झाली आहे. अदानी ग्रीन एनर्जी या कंपनीने पीएसपी प्रकल्पासाठी भूसर्वेक्षण करण्यासाठी सहमती मिळावी अशा प्रकारचे पत्र ग्रामपंचायतीला दिले होते.