आंबेत पुलासाठी स्थानिकांकडून ‘संघर्ष’

| आंबेत | वार्ताहर |

कोकणातील रेंगाळत राहिलेला सावित्री खाडीवरील आंबेत पूल हा अखेर गुलदस्त्यात सापडल्यानंतर तब्बल तीन वर्षांनंतर स्थानिकांनी एकत्र येत शुक्रवार, दि 9 सप्टेंबर रोजी आंबेत येथे संघर्ष समिती स्थापना करण्याचा निर्णय घेतला, गेली तीन वर्षे पुलाच्या दुरुस्ती बाबत कोणतीच ठोस भूमिका प्रशासनाकडून उचलली जात नसल्याचे लक्षात घेत अखेर रायगड, रत्नागिरी पट्ट्यातील असंख्य नागरिकांनी एकत्र येत ही भूमिका घेतल्याची माहिती येथील नागरिकांनी प्रतिनिधींशी वार्तालाप करताना व्यक्त केली. येत्या 2 ते 3 ऑक्टोबरदरम्यान आंबेत पुलावर स्थापन झालेल्या समितीच्या माध्यमातून तीव्र आंदोलन छेडणार असल्याची माहिती देण्यात आली.

महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री स्वर्गवासी बॅ. अंतुले यांनी सण1978 रोजी या पुलाची बांधणी केली आज तब्बल 40 वर्षे उलटून गेल्यानंतर हा पूल कमकुवत असल्याची माहिती उघड होताच सन 2019 रोजी सदर आंबेत सावित्री खाडीवरील पूल सर्व वाहतुकीसाठी बंद करण्यात आला, मात्र याचा त्रास स्थानिकांसह अन्य कोकणकरांनादेखील मोठ्या प्रमाणात झाला. पुलाच्या नवीन कामाची दुरुस्ती करण्यासाठी नवीन निविदादेखील प्रसारित करण्यात आली होती. मात्र, कोणतीच कंपनी याकडे दाद देत नसल्याचं सा.बां. विभागाकडून सांगण्यात आले. पुढील निविदेकरिता काही कंपन्या संपर्कात असून, लवकरच पुलाच्या दुरुस्तीच्या कामाची सुरुवातदेखील होईल, असे आश्‍वासन मागील महिन्यात बांधकाम विभागाकडून देण्यात आले. अद्याप कोणतीच यंत्रणा या गोष्टीकडे पोहचली नसल्याने स्थानिकांनी मात्र आता आक्रोश केला आहे.

आंबेत गावचे सामाजिक कार्यकर्ते मुफ्ती खालिद झटाम यांच्या नेतृत्वाखाली एक सोशल मीडियाच्या माध्यमातून समूह ग्रुप करण्यात आला यानंतर त्यांनी सर्वांना एकत्र बोलावत अखेर पुलाच्या बाबतीत संघर्ष समितीची स्थापना केली. यानंतर ही समिती प्रशासनाच्या शिष्टमंडळ समितीला भेटून मुख्यमंत्री यांची भेट घेणार असल्याचे या समितीकडून सांगण्यात आले. त्यामुळे रखडलेल्या पुलाच्या बाबतीत आता प्रशासन कितपत धाव घेईल, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

Exit mobile version