| कोर्लई | वार्ताहर |
मुरुड समुद्रकिनाऱ्यावरील नगरपरिषदेच्या स्वच्छतागृहाला गेल्या दोन दिवसांपासून टाळे असल्याने अनेक पर्यटकांची गैरसोय होत आहे. पाण्याची मोटार बंद पडल्याने पाणी उपलब्ध होत नाही, म्हणूनच ठेकेदाराने हे स्वच्छतागृह टाळे लावून बंद केले असल्याचे स्टॉलधारकांनी सांगितले आहे.
मे महिना सुरू असल्याने शनिवारी व रविवारी वीकेंडसाठी पर्यटकांची मुरुडकडे रेलचेल असते. रुपेरी वाळू, निळेशार पाणी, समोरच दिसणारा पद्मदुर्ग किल्ला, किनाऱ्यावर दिसणारी उंच-उंच नारळाची झाडे व एका बाजूला नवाबाचा राजवाडा असे या मुरुडचे सौंदर्य पर्यटकांना आकर्षित करत असते. सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे सर्वत्र वाहत असल्याने पर्यटक तुरळक प्रमाणातच दिसत आहेत. या आलेल्या पर्यटकांना मुरुड नगरपरिषदेतर्फे समुद्रकिनारीच स्वच्छतागृह बांधलेले आहेत. या स्वच्छतागृहाची जबाबदारी खासगी ठेकेदारांना देण्यात आलेली आहे. परंतु, गेल्या दोन दिवसांपासून या स्वच्छतागृहाला टाळे असल्याने येणाऱ्या राज्यभरातून येणाऱ्या पर्यटकांची गैरसोय होत असल्याचे दिसून येत आहे.
तरी, नगरपरिषदेने जातीने लक्ष पुरवून सदर बंद असलेल्या स्वच्छतागृहाची सुविधा पर्यटकांसाठी उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी पर्यटक व नागरिकांतून होत आहे.