| मुंबई | वृत्तसंस्था |
दिवाळीनंतर महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची बैठक होणार असून त्यानंतर लोकमोर्चा 2024 सोबत तातडीने बैठक घेण्याचा निर्णय शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सोबत झालेल्या बैठकीत घेण्यात आला. यावेळी श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर, हिंदी है हम हिंदोस्ता चे हुमायून मुरसल, सतिश लोंढे, सत्यशोधकचे किशोर जाधव, बहुजन सत्यशोधकचे सचिन बगाडे यांच्यासह लोकमोर्चा 2024 चे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते अशी माहिती कॉ. संपत देसाई यांनी दिली.
भाजप विरोधी मतांची एकजूट करणे आणि येत्या लोकसभा निवडणुकीत भाजपा आणि मित्र पक्षांचा पराभव करणे यासाठी ही बैठक होती. असेही त्यांनी सांगितले. याबरोबरच महाविकास आघाडीतील घटक पक्ष आणि लोकमोर्चा 2024 मधील पक्ष संघटना यांच्या कार्यकर्त्यांच्या जिल्हावार संयुक्त बैठका व मेळावे घेण्याचे नियोजन करण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने सातारा, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, नंदुरबार, धुळे इत्यादी जिल्ह्यात पुढील महिन्यात या बैठका व मेळावे घेण्यात येणार आहेत.