राज्य परिवहन महामंडळ रायगड विभागाचा उपक्रम
। अलिबाग । प्रमोद जाधव ।
उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये प्रवाशांच्या सेवेसाठी राज्य परिवहन महामंडळ रायगड विभागामार्फत मध्यम व लांब पल्ल्याच्या एसटी बसेस सुरू केल्या जाणार आहे. 15 एप्रिल ते 15 जून या कालावाधीत एसटी बस फेर्या सुरु केल्या जाणार असल्याची माहिती विभाग नियंत्रक कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
परीक्षा संपल्यावर अनेकजण त्यांच्या मुळगावी, मुंबई व पुणे व तसेच अन्य ठिकाणी फिरण्यासाठी जातात. उन्हाळा सुट्टीत प्रवाशांना त्यांच्या निश्चित स्थळी सुखरूप जाता, यावे यासाठी एसटी महामंडळ रायगड विभागाने जादा फेर्यांचे नियोजन केले आहे. अलिबाग, श्रीवर्धन, कर्जत, रोहा, मुरूड, माणगांव, महाड या सात आगारातून 16 ज्यादा बसेस सोडल्या जाणार आहेत.
अलिबाग-बार्शी मार्गे अहमदपूर, अलिबाग-कल्याण मार्गे जळगाव, श्रीवर्धन-ताम्हीणी मार्गे तुळजापूर, श्रीवर्धन-कल्याण मार्गे शिर्डी, हरेश्वर-स्वारगेट मार्गे अक्कलकोट, श्रीवर्धन-अहिल्यानगर मार्गे औरंगाबाद, कर्जत-वाशी मार्गे तुळजापूर, रोहा-माणगाव-बार्शी मार्गे लातूर, रोहा-माणगांव मार्गे धाराशिव, रोहा-पाली-अहिल्यानगर मार्गे बीड, मुरूड-खोपोली मार्गे छत्रपती संभाजीनगर, मुरूड-खोपोली-बार्शी मार्गे लातूर, माणगाव-बार्शी मार्गे अहमदपूर, महाड-बोरीवली, श्रीवर्धन-बोर्ली मार्गे नालासोपारा अशा फेर्या वेगवेगळ्या वेळेनुसार येता-जाता असणार आहेत. तसेच, पनवेल मार्गावर प्रवासी गर्दीनुसार ज्यादा वाहतूक व्यवस्था केली जाणार असल्याची माहिती विभाग नियंत्रक कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
उन्हाळी सुट्टीमध्ये दरवर्षी प्रवाशांच्या सेवेसाठी ज्यादा एसटी बस फेर्या सोडल्या जातात. यावर्षीदेखील 15 एप्रिलपासून नियोजन केले आहे. अलिबागसह माणगाव, महाड, श्रीवर्धन, मुरूड, रोहा, कर्जत या आगारातून या बसेस सोडण्यात येणार आहे. या फेर्यांचा जास्तीत जास्त प्रवाशांनी लाभ घ्यावा असेे आवाहन करण्यात आले आहे.
– दिपक घोडे, विभाग नियंत्रक, रायगड