परतीच्या मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा

Photography by Santosh Raul

एसटी स्थानकासह मांडवा बंदरांवर पर्यटकांची गर्दी

| अलिबाग | प्रतिनिधी |

फटाक्यांची आतषबाजी, जल्लोष करीत हॅप्पी न्यू इयर बोलत, नवीन संकल्प करीत प्रत्येकाने आपआपल्या परीने 2024 या नववर्षाचे जल्लोषात स्वागत रविवारी केले. नवी आशा, नवे स्वप्न घेत सोमवारी सकाळी पर्यटक परतीच्या मार्गावर निघाले. पर्यटकांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी नाक्या-नाक्यावर पोलिसांचा कडेकोट पहारा ठेवण्यात आला. सरत्या वर्षाला निरोप दिल्यानंतर पर्यटक पहाटेपासून त्यांच्या परतीच्या मार्गावर निघाले. मुंबई-गोवा, मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग, जिल्हा मार्ग, अलिबाग-मुरुड/पेण मार्गावर वाहतूक कोंडी निर्माण होऊ नये यासाठी जिल्हा वाहतूक शाखेचे 87 पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले होते.


अलिबाग-रेवदंडा, अलिबाग-पेण, मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. प्रवाशांच्या सुरक्षेबरोबरच त्यांना त्यांच्या निश्चित स्थळी पोहचता यावे, यासाठी वाहतूक पोलिसांनी कंबर कसली. सकाळपासून सुरु झालेल्या वाहनांच्या वर्दळीतून कुठेही वाहतूक कोंडी झाली नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. एकाच ठिकाणी वाहने उभी न राहता ती सुरळीत सुरु असल्याचे सांगण्यात आले.

अलिबाग-पनवेल ज्यादा बसेस
नव्या वर्षाचे स्वागत झाल्यावर पर्यटक सोमवारी सकाळी त्यांच्या परतीच्या मार्गावर निघाले. पर्यटकांना त्यांच्या निश्चित स्थळी वेळेवर पोहचता यावे, यासाठी अलिबाग एसटी बस आगारातून नियमित बसेस बरोबरच अलिबाग-पनवेल विना थांबा ज्यादा बसेस सोडण्याचे नियोजन केले.
मांडवा बंदरावर पर्यटकांची गर्दी
रस्त्यावर होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे अनेक पर्यटकांनी जल मार्गाला अधिक पसंती दर्शविली. त्यामुळे पीएनपी, अंजठा, मालदार आदी जलसेवेचा आधार घेत मुंबईकडे प्रस्थान केले. यावेळी सकाळपासून मांडवा बंदरावर पर्यटकांची गर्दी होती.

पोलिसांच्या मदतीला ड्रोन कॅमेरे
जिल्ह्यात लाखो पर्यटक दाखल झाले होते. सोमवारी सकाळपासून पर्यटक मुंबई, पुणेकडे निघाले. रस्त्यावरील वाहतूक कोंडीवर नियंत्रण ठेवण्यासाठी वाहतूक पोलीस काम करीत असताना त्यांच्या मदतीला ड्रोन कॅमेरे उपलब्ध करण्यात आले होते. अलिबाग-पेण मार्गावरील चेंढरे बायपास, अलिबाग-रेवदंडा मार्गावरील बेलकडे बायपास, पेण-पनवेल मार्गावरील वाशी नाका, तरणखोप, खोपोलीमधील इंद्र चौक, माणगाव-महाड मार्गावरील माणगाव एसटी स्थानक परिसर या ठिकाणी ड्रोन कॅमेऱ्यांद्वारे वाहतूक कोंडीवर नजर ठेवण्यात आली.

पर्यटक सोमवारी सकाळपासून परतीच्या मार्गावर निघाले. पर्यटकांना त्यांच्या निश्चित स्थळी सुखरूप पोहचता यावे, यासाठी वाहतूक पोलिस तैनात केले होते. ड्रोन कॅमेऱ्यांचीदेखील यावेळी मदत घेण्यात आली. त्यामुळे रस्त्यावरून बेशिस्तपणे वाहन चालविणाऱ्यांवर लक्ष ठेवता आली. जिल्ह्यातील महामार्गासह रस्त्यावरील वाहतूक सुरळीत चालू राहिली.

अनिल लाड, पोलीस निरीक्षक,
जिल्हा वाहतूक शाखा,रायगड
Exit mobile version