कोल्हेंच्या भूमिकेकडे कलावंत म्हणून पाहा – शरद पवार

। मुंबई । वृत्तसंस्था ।
राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांच्या ‘व्हाय आय किल्ड गांधी’ या चित्रपटावरुन सर्वत्रच वाद सुरु आहेत. खासदार अमोल कोल्हे यांनी या चित्रपटामध्ये नथुराम गोडसेची भूमिका साकारल्याने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनीही अमोल कोल्हेंच्या या भूमिकेचा विरोध केला आहे. दरम्यान, या सर्व वादावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अमोल कोल्हेंची पाठराखण केली असून, कलाकार म्हणून त्यांनी ती भूमिका केली असल्याचं प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले आहे.


गांधी सिनेमा संपूर्ण जगात गाजला होता. त्या चित्रपटातही कोणीतरी नथुराम गोडसेची भूमिका केली होती. ती भूमिका ज्याने केली तो कलाकार होता, तो काही नथुराम गोडसे नव्हता. कोणत्याही चित्रपटात कलाकार एखादी भूमिका करत असेल तर कलाकार म्हणूनच त्याच्याकडे पहावे लागेल, असे पवार म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराजांवरील आधारीत चित्रपटात एखाद्या अभिनेत्याने औरंगजेबाची भूमिका केली म्हणजे तो मुघल साम्राज्याचा पुरस्कर्ता होत नाही. कलावंत म्हणून तो भूमिका घेतो. किंवा रामराज्यासंबंधी सिनेमा असेल तर त्यात राम आणि रावण यांच्यातील संघर्ष दाखवला असेल तर तर रावणाची भूमिका करणारी व्यक्ती रावण असू शकत नाही. एक कलाकार म्हणून त्याच्याकडे पाहिले पाहिजे. म्हणजे सीतेचे अपहरण केले याचा अर्थ प्रत्यक्ष सीतेचे अपहरण त्या कलाकारने केले असा होत नाही. रावणाचा इतिहास त्यातून दाखवण्याचा प्रयत्न असतो. त्यामुळे अमोल कोल्हेंनी यासंबंधीची भूमिका घेतली असेल तर ती कलावंत म्हणून आहे असे ते म्हणाले.

Exit mobile version