खाद्य पदार्थांसह वस्तूंच्या खरेदीची लूट

तीन दिवसात दहा हजार नागरिकांनी दिली भेट

| अलिबाग | प्रतिनिधी |

महिलांनी तयार केलेल्या वस्तू, खाद्य पदार्थांची विक्री व प्रदर्शन अलिबाग समुद्रकिनारी ठेवण्यात आले होते. या उपक्रमाला स्थानिकांसह पर्यटकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. तीन दिवसात दहा हजारहून अधिक नागरिकांनी भेटी देऊन खाद्य पदार्थांसह वस्तू, खरेदीची लुट केली. भारतीय उद्योजकता विकास संस्था, अहमदाबाद आयोजित, टाटा कम्युनिकेशन्स लि. मुंबई पुरस्कृत उदया प्रकल्प अंतर्गत प्रशिक्षित महिला उद्योजकांसाठी दि.23 ते 25 या कालावधीत वस्तू विक्री व प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले.

अलिबाग समुद्रकिनारी फिरण्यास येणाऱ्या पर्यटकांना एकाच ठिकाणी खाद्य पदार्थांसह वेगवेगळ्या वस्तूंची खरेदी करता यावी यासाठी विविध वस्तूंचे प्रदर्शन व विक्री महोत्सव भरविण्यात आले होते. अलिबागपासून पनवेल उरण, रोहा, पेण, माणगांव अशा अनेक तालुक्यांतील दुकाने या महोत्सवात उभारण्यात आले होते. महिलांनी स्वतः तयार केलेल्या वस्तू, खाद्य पदार्थांचा आनंद यावेळी पर्यटकांसह स्थानिकांनी लुटला. शनिवार, रविवार व सोमवार सलग तीन दिवस सुट्टी असल्याने यावेळी पर्यटकांची प्रचंड गर्दी झाली. समुद्रकिनारी फिरण्याबरोबरच महोत्सवात असलेल्या नाचणी लाडू, वेगवेगळ्या प्रकारचे छायाचित्र, ड्रेस मटेरिअल, फरसाण, ज्वेलरी आदी घरगुती व भेटवस्तू वेगवेगळ्या वस्तू, खाद्य पदार्थांचीखरेदी देखील मोठ्या प्रमाणात झाली. तीन दिवसीय महोत्सवातून अनेक व्यवसायिकांनी चांगला फायदा झाल्याचे सांगण्यात आले. या उपक्रमामुळे रोजगाराचे साधन खुले झाल्याचेही ते म्हणाले.

गेल्या अनेक वर्षापासून खाद्य पदार्थ विक्रीचा व्यवसाय आहे. अलिबाग समुद्रकिनारी तीन दिवसीय महोत्सवात ग्राहकांकडून विशेष करून पर्यटकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. मोदक, कोथिंबीर वडीसारखे पदार्थ पर्यटकांनी मोठ्या प्रमाणात खरेदी केले.

विनया पाटील, अलिबाग
Exit mobile version