स्थानिक व्यावसायिकांसह बाहेरील उद्योजकांचे असणार स्टॉल
। अलिबाग । प्रतिनिधी ।
स्थानिक व्यावसायिकांसह बाहेरील व्यावसायिकांना उद्योग वाढीसाठी चालना मिळावी. त्यांना आर्थिक बळ मिळावे यासाठी अलिबाग समुद्रकिनारी लायन्स फेस्टिवल भरविण्यात येणार आहे. 23 ते 27 जानेवारी या कालावधीत हे फेस्टीवल असणार आहे. खाद्य पदार्थांसह वेगवेगळ्या वस्तू प्रदर्शन व खरेदीबरोबरोबरच वेगवेगळ्या कार्यक्रमांचा आनंद नागरिकांना घेता येणार आहे. या फेस्टिवलने 18 वर्षाची परंपरा लायन्स क्लबने जपली आहे.
हँगर पध्दतीचे विस्तीर्ण दालन, सायमा पध्दतीचे अत्याधुनिक स्टॉल जागतिक बाजारपेठेतील नामांकित ब्रँड असलेल्या मीनल मोहाडीकर यांच्या कंझ्युमर शॉपी या संस्थेबरोबरील सहकार्याने या महोत्सवात पावणे दोनशेहून अधिक स्टॉल ग्राहकांच्या सेवेसाठी असणार आहेत. व्हेज, नॉनव्हेज बरोबरच वेगवेगळे खाद्य पदार्थांचे 50हून अधिक स्टॉल खवय्यांसाठी पर्वणी ठरणार आहेत. मान्यता प्राप्त सोने, चांदी, हिरे, नामंकित ज्वेलर्स, नामांकित चारचाकी व दुचाकी वाहनांचे प्रदर्शन व विक्री या फेस्टिवलमध्ये असणार आहेत.
या फेस्टिवलचा शुभारंभ गुरुवारी (दि.23) सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास शेकाप सरचिटणीस जयंत पाटील यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी अलिबागचे माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, जिल्हाधिकारी किशन जावळे, लायन्स क्लबचे पदाधिकारी यांची उपस्थिती असणार आहे. या पहिल्या दिवशी सांस्कृतिक सोहळा म्हणून कराओके स्पर्धा घेतली जाणार आहे. शुक्रवारी (दि. 24) सायंकाळी शरीर सौष्ठव स्पर्धा, पेट शो कार्यक्रम होणार आहे. शनिवारी(दि. 25) सायंकाळी बौद्धिक क्षमता विकसित करणारा अलिबाग लायन्स टॅलंन्ट हंट कार्यक्रम होणार आहे. रविवारी( दि.26) इंडियन आयडॉल नामांकित अभिनेत्री श्वेता दांडेकर संगीत रजनी आणि, सोमवारी (दि.27) ’इंडि-सा ’ हिंदी बँड असे अनेक मनोरंजनाचे कार्यक्रम या महोत्सवाची शान वाढवणार आहेत. लायन्स हेल्थ फाउंडेशनच्या माध्यमातून नेत्रचिकित्सा, नेत्रदान, अवयवदान, देहदान यांचा प्रचार आणि प्रसाराचे कामही महोत्सवादरम्यान करण्यात येणार आहे.
या महोत्सवात रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पुरस्कृत दहाहून अधिक महिला बचत गटांचे स्टॉल, जिल्हा रुग्णालयामार्फत नेत्रदान स्टॉल व पथनाट्य होणार आहे. या महोत्सवाच्या दरम्यान शेकाप जिल्हा महिला आघाडी प्रमुख तथा पीएनपी एज्युकेशन सोसायटीच्या कार्यवाह चित्रलेखा पाटील, रायगड बाजारचे चेअरमन नृपाल पाटील,अलिबागच्या माजी उपनगराध्यक्षा अॅड. मानसी म्हात्रे, जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अॅड. गौतम पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गेे, अॅड प्रवीण ठाकूर, रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार वर्तक, अलिबाग नगरपरिषद मुख्याधिकारी आणि सर्व अधिकारी वेगवेगळ्या क्षेत्रातील अनेक मान्यवर महोत्सवादरम्यान भेट देणार आहेत.ग्राहक आणि परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून हा फेस्टिवल यशस्वी करावा ,असे आवाहन अलिबाग लायन्स क्लबच्या अध्यक्ष अॅड. गौरी म्हात्रे आणि फेस्टिवल समितीचे अध्यक्ष नयन कवळे व सर्व पदाधिकारी सदस्यांनी केले.