। अलिबाग । प्रतिनिधी ।
दिव्यांगाना आर्थिक बळ मिळावे, यासाठी अलिबागमध्ये दिव्यांगासाठी उद्योजकता जागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. भारतीय उद्योजकता विकास संस्था, अहमदाबाद आणि टाटा कम्युनिकेशन मुबई यांच्या संयुक्त विद्यमाने अलिबागमधील जिल्हा उद्योग केंद्र सभागृहात शुक्रवारी (दि.10) हा कार्यक्रम घेण्यात आला होता.
या कार्यक्रमाला मार्गदर्शक म्हणून जिल्हा उद्योग केंद्र व्यवस्थापक इंद्रायणी लोटणकर, खादी ग्रामोद्योग मंडळाचे वंजारी तसेच दिव्यांग क्रांती संघटना व दिव्यांग उत्कर्ष सामाजिक संस्थेचे अध्यक्ष बी.जी. पाटील, प्रकल्प अधिकारी गौरव काळे आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमात प्रकल्प अधिकारी शशिकांत दानोरीकर यांनी दिव्यांगांना उद्योजकता विकास प्रशिक्षणाबाबत सविस्तर माहिती दिली. मार्गदर्शन करताना इंद्रायणी लोटणकर यांनी जिल्हा उद्योग केंद्र मार्फत राबविल्या जाणार्या विविध योजनांची माहिती दिली.या जागृती कार्यक्रमात अलिबाग तालुक्यातील 57 हून अधिक दिव्यांगांनी सहभाग घेतला होता.